कोकणी माणूस कुठेही मागे राहत नाही. राजकारण असो, शैक्षणिक चळवळ असो, सांस्कृतिक वारसा असो कुठल्याही क्षेत्रात लीलया पाऊल टाकतो आणि कोणत्याही मिजासीशिवाय ऐटीत एक एक शिखर ओलांडत राहतो. हाच कोकणी माणूस शहराच्या बागुलबुव्यात जातो आणि जगायला शिकतो. कोकणी माणूस मुंबई, पुण्यात रमतो आणि पुढे कोकणातील त्याच्या घराला टाळे लावून जातो. गणपती, दिवाळी आणि मे महिन्याची सुट्टी अर्थात आंबा – काजू- फणस आणि रानमेव्याच्या काळात चाकरमानी कोकणात येतो आणि पुन्हा आपल्या कोकणी माणसात रमतो. परंतु ते काही काळापुरते असते. आज कोकणातील असंख्य घरे बंद आहेत. कोकणातील ही बंद घरांची परिस्थिती दाहक आणि भयाण आहे. याच स्थितीवर दाहक अंजन घालणारे, कडक वास्तव मांडणारे परंतु हलक्याफुलक्या विनोदाने उलगडत जाणारे नाटक म्हणजे ‘जिन चिक जिन’
नुकताच रत्नागिरी येथे ‘ जिन चिक जिन ‘ या धमाल विनोदी नाटकाचा नाट्यप्रयोग सादर झाला. नाटकाचे कथानक कोकणातील एका गावाचे खोत दिवंगत प्रतापराव परब यांच्या अनेक वर्ष बंद असलेल्या घरापासून सुरु होते. नाटकाचा सूत्रधार वजामुख्य पात्र ‘राजू गावकार’ या नाटकाची गोष्ट सांगायला सुरुवात करतो. पहिल्या अंकात या बंद पडलेल्या घरात काहीतरी मौल्यवान वस्तु लपली आहे आणि ती शोधण्यात आशुची म्हणजेच नाटकातील दुसऱ्या प्रमुख पात्राची होणारी फजिती दिसते. दुसऱ्या अंकात एक एक पात्र वाढत जाऊन अनेक वर्ष बंद असलेलं घर अचानक का भरून गेलं याची अनुभुती होते. कोकणात बंद पडत चाललेल्या घरांना पाहून जी खंत मनात निर्माण होते, तिच खंत मांडत या नाटकाचा विषय भावनिक आणि गोड केला आहे.
कोकणातील एक ज्वलंत विषय विनोदी पद्धतीने सांगणारं आणि विकणं सोपं आहे पण जपणं कठीण या आशयाचं हे विनोदी नाटकं, ज्याच लेखनं मनिष साळवी यांनी एका मिश्किल पद्धतीने केलं आहे. सहज लिहलेले कोकणी भाषेतील संवाद यामुळे हे नाटकं खूप जवळचं वाटत. नाटकं दिसताना सोपं वाटतं असलं तरी त्याचं दिग्दर्शन करणं खूप कठीण काम होतं आणि ते शिवधनुष्य दिग्दर्शक गणेश राऊत यांनी अप्रतिमरित्या पेलवल आहे. दिग्दर्शनात केलेले नवीन प्रयोग प्रामुख्याने नाटकाचं कथानक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम करतात. नाटकामध्ये लाईव्ह म्युझिक, काही उडती गाणी आणि नृत्य, उत्कृष्ट प्रकाश योजना, तेवढचं सुंदर कोकणी घराचं नेपथ्य यामुळे नाटकं अगदी जिवंत वाटतं.
या नाटकाचं नेपथ्य – जॉनी अपकरे व त्यांचे सहकारी तुषार बंडबे, रजत भरणकर यांनी तर प्रकाश योजना – शेखर मुळ्ये यांनी केली आहे. तसेच या नाटकाला – ऋतुराज बोंबले यांनी कीबोर्ड, पार्थ देवळेकर यांनी पखवाज आणि आयुष कळंबटे यांनी ढोलकीने साथ दिली. सर्वच कलाकारांनी खूप सुंदर काम केले आहे. प्रत्येकाचे काम लक्षात राहणारे आहे. नाटकामध्ये राजू गावकार, आशुतोष आणि प्रियांका ही तिन्ही पात्र विशेष छाप पाडून जातात. पात्र परिचय- राजू गावकार – स्वप्नील धनावडे, आशुतोष – किरण राठोड, प्रियंका- सौ. आसावरी गणेश राऊत-आखाडे, प्रकाश काका – तन्मय राऊत, काकी – साक्षी कोतवडेकर, महेश – तुषार गिरकर आणि राजेश/ जिन- रोहन शेलार.