आज २१ जून जागतिक संगीत दिन आणि जागतिक योग दिन! हा योगायोगच समजावा काय?
युज्यते अनेन इति योग:। योग म्हणजे जोडणे. ढोबळ मानाने योग म्हणजे मन आणि शरीर यांना जोडणे असा अर्थ अभिप्रेत आहे. अष्टांग योगाचे अवलंबन करताना मग या जोडण्याच्या पायऱ्या वर वर चढत असता पिंडी ते ब्रह्मांडी हा जोड साधावयाचा आहे. आत्म्याचे परमात्म्याशी जुळणी म्हणजे योग. पण ही खूप उच्च अवस्था झाली. तूर्तास मानव आणि समाज म्हणजेच एक्सटेंडेड फॅमिली यांचा दुवा जरी साधता आला तरी आपण खूप काही मिळवलं असं म्हणता येईल.

जी गोष्ट योगाची तिच संगीताची नाही का? संगीत त्यातही हिंदुस्थानी अभिजात संगीत म्हणजे तर जीवाची शिवाशी गाठच. परमोच्च आनंद मिळवून देणारे हे संगीत फक्त वैयक्तिकच नाही तर एकत्रिक, सामाजिक अगदी वैश्विक म्हटलं तरी अतिशयोक्ती नाही होणार असा आनंद असा जोड संगीताने निर्माण होतो. जगात कुठेही पहा स्वर सातच. पण त्या सात स्वरांची विविध combinations करून किती किती सुरावटी निर्माण होतात आणि समस्त जनमानसाला रममाण करून जातात.
योगसाधनेने मन आणि शरीर यांचं संतुलन राहते. रोगांपासून लांब राहता येते. सुदृढ निरोगी निरामय आयुष्याची प्राप्ती होते. तर संगीतसाधनेने सुद्धा मन स्वस्थ आणि शांत राहायला मदत होते. आत्मिक समाधान आणि मनाची शांत अशी अत्युच्च अवस्था प्राप्त करणे शक्य होते.
म्हणूनच की काय न जाणे आजच्या एकाच दिवशी योग आणि संगीत दोन्ही दिन साजरे करण्याचा अद्भुत योग जुळून आलेला आहेत.
– उमा जोशी






सारेच लेख अतिशय वाचनीय,ओघवते नि छोटेसे तरीही खूप काही सांगणारे…जीवनाचे मर्मच मांडून जातेस सहजपणाने….