काल सहज डॉ. सुधा मूर्तींचा एक लेख वाचनात आला. ‘विशीतील आदर्शवाद आणि चाळिशीतील वास्तवतावाद’!
खरंच आहे ऐन उमेदीत विशीत आपण फारच आदर्शवादी असतो. तारुण्यातील उसळणारं रक्त असेल, नुकताच लागलेला शैक्षणिक स्वातंत्र्याचा वारा असेल किंवा अनुभवांची तोकडी शिदोरी असेल ; कारण काहीही असेल पण त्या वयात आपल्या कल्पना फारच आदर्शवादी असतात हे खरं!
त्याउलट चाळीशीत आपण वास्तव स्वीकारायला सुरुवात करू लागलेले असतो. शिक्षण आणि त्याचे उपयोजन यातील दरी सांधत सांधत जीव मेटाकुटीला आलेला असतो. अनुभवांचं बऱ्यापैकी मोठं आणि जड गाठोडं आता आपल्यापाशी असतं. नोकरी-धंद्यातलेच नाही तर वैयक्तिक आयुष्यातसुद्धा अनेक चढ उतार सहन करून पोळलेले आपण आदर्श सोडून हळूहळू वास्तव स्वीकारायला लागलेले असतो.
आता हे स्वीकारणं काही वेळा जड जातं पण स्वीकारण्यवाचून गत्यंतर नसतं. मागे वळून पाहताना आपल्याच लक्षात येतं की आपण स्वतःविषयी फारच अवास्तव कल्पना बाळगल्या होत्या आणि कितीही काहीही केले तरी पूर्ण होणे शक्य नाही. काही जण हे वास्तव सहज स्वीकारतात तर काही जणांना फार त्रास होतो वास्तव स्वीकारताना.
पण हे वास्तव स्वीकारणं म्हणजेच स्वतःत घडवून आणलेलं परिवर्तनच होय. बदल हा सृष्टीचाच नियम आहे. आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःत बदल घडवून सारी सृष्टी अजूनही टिकून आहे. ‘Survival of the fittest’ जो काळाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे बदलला तो टिकला , जो नाही बदलला तो मोडला, नामशेष झाला.

म्हणूनच जरं टिकून राहायचं असेल तर बदल, परिवर्तन आवश्यक आहे. मग हे परिवर्तन आपण मनापासून स्वीकारलं तर सोपं होईल आणि आनंददायी होईल आपल्यालाही आणि आपल्या सोबत असणाऱ्यांनाही. परिस्थितीने लादलय म्हणून परिवर्तन करायला गेलो तर कदाचित ती प्रक्रिया क्लेशदायक ठरेल आणि म्हणूनच काळाची पावलं ओळखून वेळीच परिवर्तनशील राहणं हे चांगलंच नाही का?
– उमा जोशी





