मुंबई – गोवा महामार्गाच्या प्रश्नावर ना. रवींद्र चव्हाण यांनी ‘हुजुर’चे नाव घेताच गदारोळ
रत्नागिरी : प्रतिनिधी
देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घातले आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या १४ वर्ष रखडलेल्या कामाला १५ व्या वर्षात गती आली. कधी नव्हे ते एक राज्याचा बांधकाम मंत्री अहोरात्र कष्ट घेऊन मागच्या वर्षी महामार्ग दौरे करू लागला. त्यामुळे या महामार्गाचा प्रश्न सुटेल असे वाटू लागले. परंतु समस्या काही सुटायला तयार नाहीत. कोकणातील या महामार्गाचे काम खा. नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र ना. उदय सामंत यांच्या रत्नागिरीत व खा. सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात या महामार्गाचे काम मंदावलेले आहे. यात दोष कुणाचा? त्याचे उत्तर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सभागृहात दिले. आमदार विक्रम काळे यांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. मात्र विरोधकांनी गदारोळ केल्याने खरा दोषी कोण हे पुढे आले नाही. ना. चव्हाण यांनी हुजुर कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाव घेतल्यावर विरोधकांनी गदारोळ केला आणि कोकणच्या विकासाचे मारेकरी आपणच असल्याचे सिद्ध केले.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता, ज्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला. या गोंधळामुळे सभागृह दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, मंत्री रविंद्र चव्हाण यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत स्पष्टीकरण दिलं. काळे यांनी विचारलं की, “इतके मंत्री होवून गेले, चव्हाण यांचे सारखे फोटो येतात पेपरमध्ये, पण मग रस्ता पूर्ण का होत नाही? हा हायवे राज्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. चव्हाण यांनी उत्तर दिलं की, ही वस्तुस्थिती आहे की हा रस्ता खराब आहे. हा ६५० किमीचा रस्ता आहे. तत्कालीन सरकारने १० पॅकेजेस तयार केले होते. हा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला गेला पण भूसंपादन केले गेले नाही. त्यामुळे हा रस्ता रखडला आहे. आता पहिले पॅकेज पनवेलपासून सुरू होतं. ४२ किमीचा रस्ता पूर्ण झालाय. सर्व्हिस रोड थोडे राहिले आहेत. कासूपासून पुढचा रस्त्याचे काम दोन्ही बाजूचे पूर्ण झाले आहे. फक्त ब्रिजेस बांधणाऱ्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट केलंय, आता नवीन कंत्राटदार नेमला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यामागचा खरा दोषी कोण? हे जनतेनेच ठरवावं. मी कोकणचा सुपुत्र आहे, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडल्यामुळे कोकणवासीयांना जे सहन करावं लागलं त्याची आम्हाला कल्पना आहे. पण यामागचे खरे दोषी कोण आहेत? हे आज विधानपरिषदेत विस्तृतपणे सांगत होतो. ‘मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?’ या प्रकरणाचं पूर्ण सत्य उलगडू लागल्यावर विरोधकांचे धाबे दणाणले. कोकणवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नाचं उत्तर विरोधक शांतपणे ऐकून घेतील, अशी आशा होती. परंतु विरोधकांनी सभेत इतका गोंधळ माजवला की विधान परिषदेचे सत्र तहकूब करण्याशिवाय दूसरा पर्याय उरला नाही. मला या प्रकरणावर पूर्ण प्रकाश टाकण्यापासून अडवण्याचा प्रयत्न विरोधकांनी नेमका का केला? मुंबई-गोवा महामार्गाचं पूर्ण सत्य जनतेच्या समोर येण्याची विरोधकांना धास्ती का वाटते? याचं उत्तर आता जनतेने विरोधकांनाच विचारायला हवं. – ना. रवींद्र चव्हाण
ना. चव्हाण यांनी पुढे सांगितलं, माणगावपासून पुढचा रस्ता ८४ किमीचा आहे. त्यालाही कुठे अडचण येत नाहीये. निवडणुकीच्या आचार संहितेमुळे मानगाव बायपासचे टेंडर काढले गेले नाही. १०० पेक्षा जास्त वॉर्डन लावले जातील. काम घेतले एकाने दिले चौथ्याला. यामुळे बाजार उठला आहे. ज्या बँका आणि वित्तीय संस्थांनी कर्ज दिले होते त्यांनी कसे दिले, कोणाच्या सांगण्यावरून दिले, हे पाहिले पाहिजे. या रस्त्याचे काम झाले पाहिजे, पण हुजूर कंपनी चालवतं कोण याची चौकशी झाली पाहिजे, याच्या खोलात गेला पाहिजे. आम्ही कोकणातले आहोत. लोकं आम्हाला बोलतात आम्ही काम केले नाही, पण वास्तव आहे की अधिकारी आणि काही लोकांनी मिळून ह्याची वाट लावली. हे सांगताना हूजुर कंपनीचे नाव घेताच विरोधकांनी गदारोळ गदारोळ केला आणि कोकणच्या विकासाचे मारेकरी आपणच असल्याचे सिद्ध केले.





