मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभाग आणि विविध नामांकित कंपन्यांमध्ये आज मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रातील ऐतिहासिक सामंजस्य करारांचे (MoUs) आदानप्रदान करण्यात आले. एनटीपीसीएल (NTPCL), अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले आहेत. या नवीन करारांमुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात लाखो कोटींची गुंतवणूक होणार असली, तरी या प्रकल्पांमुळे ‘तळ कोकणाच्या माथी अणूऊर्जा’ मारली जात असल्याची चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे.
एकीकडे लाखो कोटींची गुंतवणूक आणि सव्वा लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मितीचा दावा सरकार करत असले, तरी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या रत्नागिरी (बारसू, पूर्णगड) आणि सिंधुदुर्ग (देवगड) या तळ कोकणातील भागांमध्ये हे अणूऊर्जा प्रकल्प लादले जात असल्याने स्थानिक जनतेमध्ये मोठी चिंता आहे. आधीच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला आणि बारसू रिफायनरीला झालेल्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर, आता या तीन नवीन अणूऊर्जा प्रकल्पांमुळे कोकणात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोकणातील ‘ही’ आहेत प्रकल्पांची निश्चित ठिकाणे मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) दिलेल्या माहितीनुसार, तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलप्रमाणे भव्य अणूऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहेत:
- १. बारसू (जि. रत्नागिरी) – अदानी पॉवर लिमिटेड प्रकल्प : अदानी पॉवर लिमिटेड आणि त्यांची कोस्टल-महा ॲटोमिक एनर्जी लिमिटेड यांच्या वतीने बारसू येथे अणूऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. क्षमता व गुंतवणूक: ६,००० मेगावॅट क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी तब्बल ₹१,५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून सुमारे १२,००० (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष) रोजगार संधी निर्माण होतील.
- २. पूर्णगड (जि. रत्नागिरी) – रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड प्रकल्प : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून पूर्णगड येथे ‘भारत स्मॉल रिॲक्टर्स’ / स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (SMR) अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. क्षमता व गुंतवणूक : २ X २२० मेगावॅट ते ६ X १२०० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी ₹८,००० कोटी ते ₹२,००,००० कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या प्रकल्पाद्वारे सर्वाधिक म्हणजे तब्बल १,०६,००० रोजगार निर्मितीचा अंदाज आहे.
- ३. देवगड (जि. सिंधुदुर्ग) – राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ (NTPC) प्रकल्प : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे एनटीपीसी (NTPC) च्या माध्यमातून अणूऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. क्षमता व गुंतवणूक : एकूण ६ युनिट्सद्वारे ४,००० ते ७,२०० मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असून यासाठी ₹१,००,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे ५,००० लोकांना रोजगार मिळण्याचा अंदाज आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी ही गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरेल. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्य केले जाईल.” या बैठकीला पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि संबंधित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




