रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी नगरपरिषदेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे की प्रशासकीय पातळीवर प्रचंड उदासीनता आहे, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे. नगरपरिषदेने विविध विकासकामे करणारे कंत्राटदार, विविध वस्तूंचा पुरवठा करणारे पुरवठादार, वाहन मालक आणि थेट स्वतःच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देयकेअद्याप थकवून ठेवल्याचे एका माहिती अधिकारातून उघड झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते अमेय प्रदीप परूळेकर यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये केलेल्या अर्जाला उत्तर देताना नगरपरिषदेच्या जनमाहिती अधिकारी तथा लेखापाल यांनी प्रलंबित देयकांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. याचा अभ्यास केला असता, नगरपरिषदेवर सध्या १५ कोटी २१ लाख ८० हजार ४३४ रुपयांची (निव्वळ देयक रक्कम ₹१४,९९,११,३३७) प्रचंड मोठी थकबाकी असल्याचे उघड झाले आहे.
या सर्व प्रलंबित देयकांचा विभागनिहाय सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.
१. पाणीपुरवठा विभाग (सर्वाधिक थकबाकी: ₹११.४१ कोटी) नगरपरिषदेच्या संपूर्ण थकबाकीमध्ये सिंहाचा वाटा पाणीपुरवठा विभागाचा आहे. शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेकरिता आवश्यक साहित्याचा पुरवठा करणे, २८० मीमी व १६० मीमी व्यासाच्या एचडीपीई (HDPE) जलवाहिनीची खुदाई करून जोडणी करणे या कामांसाठी ‘एम एम अग्रवाल’ यांची तब्बल ३ कोटी ५९ लाख १५ हजार ५१३ रुपयांची तीन वेगवेगळी बिले प्रलंबित आहेत. याशिवाय राज्यस्तर पाणीपुरवठा योजनेच्या खात्यात वर्ग करावयाची वस्तू व सेवा कर (GST) आणि वाढीव निवेदेची मिळून १० कोटी ९० लाख ७३ हजार ८५३ रुपयांची रक्कम थकीत आहे.
२. बांधकाम विभाग (एकूण थकबाकी: ₹१.०५ कोटी) शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण, भाजी मार्केट आणि शॉपिंग सेंटरचा विकास, शाळांची दुरुस्ती या कामांचे पैसे नगरपरिषदेने थकवले आहेत. कंत्राटदार अभय तेंडुलकर यांचे न.प. शाळा क्र. ०२ (लोकमान्य टिळक विद्यालय) च्या तळमजला, पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्याच्या बांधकामापोटी वेगवेगळ्या ९ बिलांचे एकूण २२ लाख ३१ हजार ४०५ रुपये थकले आहेत. शुभम भागवत यांचे छ. शिवाजी महाराज स्टेडियममधील गाळ्यांची दुरुस्ती आणि पाईप गटर बांधकामाचे मिळून २२ लाख ७४ हजार २०९ रुपये प्रलंबित आहेत.
प्लांनिटेक कन्सल्टन्सीचे रस्ते काँक्रिटीकरणाचे २९ लाख १६ हजार ९२४ रुपये, तर युनिव्हर्सल मेडिकल इन्स्ट्रुमेंटचे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय यंत्रसामग्री पुरवल्याचे ७ लाख ८० हजार ७८२ रुपये थकीत आहेत. याशिवाय माउली कन्स्ट्रक्शन (शॉपिंग सेंटर विकास – ₹५,२३,२४८), वैभव पाटील (प्ले ग्राउंड विकास – ₹४,१७,७१९) आणि आदित्य घोरपडे (भाजी मार्केट व विठ्ठल मंदिर सुशोभीकरण – ₹२,७३,९८८) यांचीही देयके प्रलंबित आहेत.
३. विद्युत विभाग (एकूण थकबाकी: ₹६०.१२ लाख) शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या विद्युत कामांचे बिल अद्याप मिळालेले नाही. मंदार इलेक्ट्रिकल यांचे तारांगण परिसरात डेकोरेटिव्ह पोल उभारणे, सावरकर, आंबेडकर व जिजामाता पुतळ्यासाठी केबलसह नवीन फिटिंग करणे आणि थिबा पॅलेस राजामाता जिजामाता उद्यानाचा विकास करणे या कामांचे एकूण १९ लाख ७३ हजार २८७ रुपये थकले आहेत. तर साईलिला व साईस्वरूप इलेक्ट्रिकल यांचे स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये साऊंड सिस्टीम आणि ग्रीन रूमकरिता स्प्लिट एसी यंत्रणा बसवण्याचे तब्बल २८ लाख २१ हजार रुपयांचे बिल प्रलंबित आहे. श्री दत्तसाई इलेक्ट्रिकल यांचेही अंदाजे १२ लाख रुपये थकीत आहेत.
४. स्वच्छता (Safai) विभाग (एकूण थकबाकी: ₹१७.३६ लाख) शहराच्या आरोग्याशी संबंधित कामांचे पैसेही वेळेवर दिलेले नाहीत. पी एस पेडणेकर यांचे मोकाट गुरे पकडणे आणि कोंडवाड्यामध्ये चारा पुरवण्याचे २ लाख २६ हजार २०० रुपये थकले आहेत. न्यू साई फायबर्स (New Sai Fiber’s) चे स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ नग मोबाईल टॉयलेट पुरवण्याचे १३ लाख २ हजार रुपये प्रलंबित आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कंत्राटदार संदेश कांबळे यांचे शहरातील बेवारस प्रेतांची विल्हेवाट लावण्याचे प्रत्येकी १,००० आणि २,००० रुपयांचे ५ ते ६ महिने जुने बिल देखील नगरपरिषदेने थकवून ठेवले आहे.
५. आस्थापना विभाग (निवृत्त कर्मचाऱ्यांची क्रूर चेष्टा : ₹१.०० कोटी) कंत्राटदारांप्रमाणेच नगरपरिषदेने स्वतःच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे रोखून धरले आहेत. सुशिल मांडवकर (अंशराशीकरण व अर्जित रजा – ₹१९.८५ लाख), प्रसन्न भोळे (₹५.१५ लाख), सुरेश फुटक (अर्जित रजा व पेन्शन विक्री – ₹१२.४८ लाख), मनोज कदम (₹१४.७९ लाख), मुकुंद पवार (₹१२.५५ लाख) आणि अस्मिता कोत्रे (₹९.९८ लाख) या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ प्रलंबित आहेत. आयुष्याची अनेक वर्षे नगरपरिषदेला देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयोमानानुसार निवृत्त झाल्यावर पैशांसाठी चकरा माराव्या लागत आहेत.
६. इतर विविध विभागांची थकबाकी:
वाहन विभाग (लेबर देयके):कंत्राटदार एस पी एंटरप्रायजेस आणि रत्नसिंधू स्वयं सेवा यांचे नगरपरिषदेला जेसीबी, इनोव्हा या गाड्या वसुली व इतर कामांसाठी पुरवल्याचे एकूण ९ लाख ३२ हजार रुपयांपेक्षा जास्त बिल प्रलंबित आहे.
भांडार (Store) विभाग:विविध विभागांसाठी आवश्यक फर्निचर खरेदी, दस्तऐवज बांधणीसाठी कापड खरेदी आणि दैनिक वृत्तपत्रे खरेदीचे १० लाख ३२ हजार ०९३ रुपये थकले आहेत.
CFC (नागरी सुविधा केंद्र): नागरी सुविधा केंद्रात आवक-जावक, जन्म-मृत्यू दाखले, संगणक प्रणाली आणि टपाल वाटपाचे काम आऊटसोर्सिंग तत्त्वावर करणाऱ्या ‘रत्नागिरी तालुका बेरोजगार सहकारी स्वयं सेवा’ संस्थेचे सप्टें, ऑक्टो आणि नोव्हेंबर २०२५ चे एकूण ४ लाख ८९ हजार ४५० रुपये थकवले आहेत.
लेखा विभाग: निनाद खानविलकर यांचे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे ५ वेगवेगळे क्लेम आणि विमा संचालकांचे मिळून एकूण १७ लाख ८ हजार ८८० रुपये थकीत आहेत.
उद्यान व नगररचना विभाग: उद्यान विभागाचे ५.०५ लाख रुपये तर नगररचना विभागाचे जाहिरात बिले आणि कायदेशीर फी चे मिळून २.०१ लाख रुपये प्रलंबित आहेत. या सर्व माहितीवरून रत्नागिरी नगरपरिषदेचा गाडा पूर्णपणे ‘उधारी’ आणि ‘थकबाकी’वर चालत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. आता ही कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रशासन कधी जाहीर करणार, याकडे संपूर्ण रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.




