रत्नागिरी : प्रतिनिधी
झुडिओ (Zudio) कपड्यांची फ्रँचायझी देण्याचे आमिष तसेच मंत्रालयात बोगस सरकारी नोकरीचे नियुक्ती व मुलाखतीचे पत्र देऊन तब्बल १,१०,०१,०८३ रुपये (एक कोटी दहा लाख एक हजार त्र्याऐंशी रुपये) उकळून फसवणूक केल्याची घटना रत्नागिरीत समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही घटना १८ नोव्हेंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रत्नागिरीतील गाडीतळ परिसरात घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी रॉबीन स्टीव्हन्स सोन्स (वय ४९, रा. जयस्तंभ, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली असून, आकाश प्रकाश रसाळ (रा. परटवणे, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फ्रँचायझीचे आमिष : आरोपी आकाश रसाळ याने झुडिओ कपड्यांची फ्रँचायझी सुरू करण्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. या व्यवहारापोटी त्याने फिर्यादीकडून १,१०,२२,०५४ रुपये घेतले. मात्र, ठरल्यानुसार फ्रँचायझी देण्यात आली नाही. पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने १२,२०,९७१ रुपये परत केले, मात्र उर्वरित ९८,०१,०८३ रुपये अद्याप परत न करता अपहार केल्याचे अहवालात नमूद आहे.
बोगस सरकारी नोकरीचे आमिष : फ्रँचायझीच्या व्यवहारासोबतच फिर्यादीच्या नातेवाईकांना मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देऊनही पैसे उकळण्यात आले. फिर्यादीच्या मावस बहिणीला मंत्रालयात ‘डेप्युटी कलेक्टर’ पदाचे खोटे नियुक्तीपत्र देण्यात आले, तर दुसऱ्या मावस बहिणीला (पद्मश्री सचिन पेटकर) व त्यांच्या पतीला (सचिन सनिल पेटकर, रा. बोरिवली, मुंबई) मंत्रालयातील बांधकाम विभागात क्लार्क पदाच्या मुलाखतीचे बनावट पत्र देण्यात आले.
नोकरीसाठी घेतलेली रक्कम : या बोगस नोकरीच्या आमिषापोटी आरोपीने १५,००,००० रुपये (पंधरा लाख रुपये) घेतले. बनावट कागदपत्रे असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने रक्कम परत मागितली; त्यातील केवळ ३ लाख रुपये परत करण्यात आले, तर १२ लाख रुपये अद्याप परत केलेले नाहीत.
पोलीस कारवाई : बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण १,१०,०१,०८३ रुपयांची फसवणूक व अपहार झाल्याचे नमूद आहे. रत्नागिरी शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
आर्थिक फसवणूक झाल्यास काय करावे?
- तात्काळ तक्रार करा : राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा.
- खाते व कार्ड ब्लॉक करा : संबंधित बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून बँक खाते, कार्ड किंवा UPI व्यवहार तात्पुरते बंद करा.
- पुरावे जतन करा : व्यवहार क्रमांक (UTR/Reference ID), बँक स्टेटमेंट, कॉल रेकॉर्डिंग, चॅट, ईमेल किंवा संशयास्पद वेबसाईटचे स्क्रीनशॉट सुरक्षित ठेवा.




