रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीच्या सागरी हद्दीत सध्या माशांच्या प्रजननाचा (ब्रीडिंग) नाजूक आणि अत्यंत महत्त्वाचा काळ सुरू आहे. या काळात सागरी जीवसृष्टीचे रक्षण व्हावे आणि मत्स्यसंपदा टिकून राहावी, यासाठी प्रशासनाकडून किनाऱ्यालगत सर्व प्रकारच्या मासेमारीवर कडक बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या सरकारी बंदीचे अध्यादेश कागदावरच राहिले असून, रत्नागिरीच्या समुद्रात अवैध ‘एलईडी’ (LED) मासेमारीचा धुमाकूळ राजरोसपणे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
प्रजनन काळातच मत्स्यसंपदेचा विनाश
प्रजननाच्या काळात मासे किनाऱ्यालगतच्या उथळ पाण्यात अंडी घालण्यासाठी येतात. मात्र, याच काळात काही अती-लोभी मच्छीमार रात्रीच्या वेळी समुद्रात बेकायदेशीरपणे शक्तिशाली एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी करत आहेत. प्रकाशामुळे अंडी घालणारे लहान-मोठे मासे एकत्र जमतात आणि लहान गेज जाळ्यांद्वारे त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. यामुळे समुद्रातील मत्स्यबीज नष्ट होऊन भविष्यात संपूर्ण मत्स्यव्यवसायच धोक्यात येण्याची गंभीर भीती पारंपरिक मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
बंदर विभागाचा ‘आशीर्वाद’?
रात्रंदिवस सुरू असलेल्या या बेकायदेशीर उद्योगाकडे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभाग पूर्णपणे डोळेझाक करत आहे. बंदीच्या काळात समुद्रात गस्त घालणे, बेकायदेशीर नौकांवर कारवाई करणे ही या विभागांची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने “बंदर विभागाच्या आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा काळा धंदा फोफावला आहे का?” असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे
एकीकडे पारंपरिक मच्छीमार देशधडीला लागत असताना आणि सागरी पर्यावरणाचा र्हास होत असताना, समाजाचा आरसा मानला जाणारा ‘चौथा स्तंभ’ (माध्यम) मात्र या विषयावर मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे. स्थानिकांच्या आणि पारंपरिक मच्छीमारांच्या या गंभीर प्रश्नावर आवाज उठवण्याऐवजी मौन बाळगल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नियमांचे पालन करणाऱ्या निष्पाप पारंपरिक मच्छीमारांवर या बेकायदेशीर मासेमारीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्वरित या अवैध एलईडी मासेमारीवर कठोर कारवाई करून संबंधित दोषींवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.




