रत्नागिरी : प्रतिनिधी
पावसाच्या रूपाने निसर्गाने दिलेला अनमोल पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून उन्हाळ्यातील टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लांजा तालुक्यातील ‘मठ’ येथे सामूहिक श्रमदानाचा एक सुंदर आदर्श उभा राहिला. आमदार किरण सामंत यांच्या संवेदनशील आणि प्रेरणादायी उपस्थितीत ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी एकत्र येत श्रमदानातून वनराई बंधारा साकारला. हातांनी उचललेली माती आणि एकवटलेली ताकद यांच्या संगमातून जलसंधारणाच्या कामाला नवा वेग मिळाला.

पावसाळ्यानंतर ओढ्या-नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे आणि गावाला जलस्वयंपूर्ण बनवणे, या उदात्त हेतूने ही श्रमदानाची मोहीम हाती घेण्यात आली होती. आमदार किरण सामंत यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या कृतीतून या उपक्रमाचे कौतुक केले व ग्रामस्थांच्या उत्साहाला पाठबळ दिले. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थ एकाच उद्दिष्टाने एकत्र आल्याने शासकीय उपक्रमाला खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.
या प्रेरणादायी मोहिमेला विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहकार्य लाभले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, लांजा तालुका सभापती मानसी आंबेकर, गुरु देसाई, जिल्हा परिषद सदस्य संतोष रेवाळे, पंचायत समिती सदस्य दीपाली दळवी, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, विभागप्रमुख अल्ताफ काझी, उपविभागप्रमुख गुरुप्रसाद मनोहर पवार, विस्तार अधिकारी संजय लोखंडे व संजय कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कामात उतरून हा बंधारा पूर्ण करण्यात गावातील प्रत्येक घटकाने मोलाची भूमिका बजावली. मठ ग्रामपंचायतीच्या प्रशासक स्वाती पाटील, ग्रामसेवक श्री. गमरे यांच्या नियोजनाखाली दीपेश कडू, दिलीप गुणाजी पानकर, संतोष अडबल, हेमंत मोघे, सुजाता कांबळे, सीआरपी संध्या पांचाळ, स्थानिक शिक्षक वर्ग, गावातील सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचारीवृंदाने श्रमदानात घाम गाळला. विशेषतः महिलांचा आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या मोहिमेचे मुख्य आकर्षण ठरला.
भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता ओळखून आजच घेतलेला हा पुढाकार लांजा तालुक्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्नही सुकर होणार आहे. ‘एकजुटीचे बळ आणि पाण्याचे मोल’ प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत मठ गावाने जलसमृद्धीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.




