रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीतील फणसवळे येथे झालेल्या निर्घृण गोवंश कत्तलीतील अज्ञात आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यात होत असलेल्या गोहत्या आणि गोतस्करी तात्काळ बंद व्हावी, यासाठी समस्त हिंदुत्ववादी संघटना, गोरक्षक, गोप्रेमी यांनी पोलिस अधिक्षक रत्नागिरी यांच्या कार्यालयावर धडक दिली. जिल्ह्यात होत असलेल्या गोतस्करी आणि गोहत्येवर कोणतेही नियंत्रण पोलिस प्रशासनाचे राहिलेले नाही, असे फणसवळे येथील घटनेवरुन दिसत आहे. गोमाता राज्यमाता म्हणून घोषित झाली; तरी ही राज्यमाता सुरक्षित झालेली नाही तिची सरेआम कत्तल होत आहे. या सर्वांना जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई कधी होणार, असा प्रश्न समस्त हिंदूंनी पोलिस अधीक्षकांसमोर उपस्थित केला. यावर उत्तर देताना पोलिस अधिक्षक नितिन बगाटे यांनी जिल्ह्यात त्यांच्या नियुक्तीनंतर झालेली कारवाइची माहिती दिली. सदर घटनेसंदर्भात मी स्वतः जातीने लक्ष घातले असून थोड्याच दिवसात तुम्हाला त्याच्या परिणाम दिसेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित गोहत्या आणि गोतस्करी थांबवण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्याची मागणी केली असता अशा पथकाची निर्मिती करु, असे आश्वासन पोलिस अधिक्षक बगाटे यांनी दिले.
यावेळी पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फणसवळे गावच्या तांबड्याचा प-या येथील कातळमय भागात अज्ञात समाजकंटकांनी अत्यंत क्रूरपणे सुमारे चार गोवंश जनावरांची कत्तल केल्याची धक्कादायक घटना २१ जून २०२६ रोजी उघडकीस आली आहे. ही कत्तल दोन दिवस आधी झाली असल्याचा अंदाज असून अनुमाने दीड टन गोमांस सापडले आहे. या संदर्भात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमध्ये आरोपींनी जनावरांची बोकडासारखी मान कापून, चामडी सोलून आणि आतडी बाहेर काढून अत्यंत अमानुषपणे ही कत्तल केली आहे. धार्मिक भावना दुखावण्याचा कट: हिंदू समाजात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गोवंशाचे असे छिन्नविच्छिन्न अवशेष उघड्यावर टाकून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा आणि परिसरातील सामाजिक शांतता बिघडवण्याचा हा पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. गोवंशाचे अवशेष अनुमाने २ दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने उघड्यावर टाकण्यात आले, त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला.
रत्नागिरीसारख्या शांत आणि सुसंस्कृत जिल्ह्यात अशा प्रकारे कायद्याची कोणतीही भीती न बाळगता गोवंशाची कत्तल होणे अत्यंत चिंताजनक आहे. या आधीही रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशाच्या कत्तली झाल्याच्या, गोमांस सापडल्याच्या अनेक घटना घडल्या असून गोवंशाची बेकायदा वाहतूक (गोतस्करी) अद्यापही सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे. यावरून गोतस्कर आणि गोवंश हत्यारे यांना पोलिस प्रशासनाचा कोणताही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे समस्त हिंदु समाजात तीव्र असंतोष आणि संतापाची लाट उसळली आहे.
या निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा पोलिसांनी तात्काळ युद्धपातळीवर शोध घेऊन त्यांना अटक करावी. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमाच्या अंतर्गत लावण्यात आलेल्या कलमांनुसार जलदगती न्यायालयात (Fast Track Court) खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी शासनाने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी. रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध पशू वाहतूक आणि गोवंश कत्तलीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करावी आणि पोलीस प्रशासनाला कडक निर्देश देण्यात यावेत. या गुन्ह्यातील आरोपींवर मकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. पोलिस तपास नाक्यांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह वाढ करावी.
जर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली नाही, तर समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, विश्वमंगल गोशाळा, सोमेश्वर, गो सेवा संघ रत्नागिरी,भाजपा, मनसे यांचे प्रतिनिधी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गोरक्षक, गोसेवक मोठ्या संखेने उपस्थित होते.




