रत्नागिरी : प्रतिनिधी
सध्याचे युग हे डेटाचे आहे. ज्याच्याकडे सर्वाधिक डेटा तो किंग असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभागाचे जिल्हा सांख्यिकी कार्यालय हा सर्वप्रकारचा डेटा गोळा करण्याचे काम करतयं, ही अतिशय महत्वाची बाब आहे, असे गौरवद्गार गोगटे जोगेळकेर महाविद्यालया सहयोगी प्रा. उमा जोशी यांनी काढले.
जिल्हा नियोजन कार्यालय व जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांच्यावतीने आज राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. सांख्यिकीचे जनक प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, उपसंचालक निवास यादव आदी उपस्थित होते.
‘निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर’ या विषयावर प्राध्यापक श्रीमती जोशी यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, समाजाच्या उद्धारासाठी आवश्यक निर्णय घेण्यासाठी अत्यावश्यक असतो तो म्हणजे डेटा. पूर्व इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्य याचा समन्वय साधून निर्णयाप्रत येण्यासाठी, त्या त्या क्षेत्रातील डेटा आवश्यक असतो. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामध्ये हा विभाग त्यासाठी काम करतोय, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.
जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मुळे यांनीही यावेळी डेटाचे महत्व विशद केले. डेटा असल्याशिवाय कोणताच निर्णय घेता येत नाही. त्यासाठी प्रा. महालनोबिस यांनी पाया घालून दिला आहे. त्याच आधारावर नव नवीन संशोधनात्मक वाटचाल सुरु असते.
प्रास्ताविकेत उपसंचालक श्री. यादव यांनी प्रा. महालनोबिस यांचा संपर्ण जीवन परिचय सांगितला. अध्यक्षीय भाषणात श्री. सातपुते म्हणाले, सध्याच्या माहिती युगात मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील माहिती असणे आवश्यक आहे. त्याच जोरावर यशस्वी वाटचाल करता येते. अगदी उद्योग व्यवसायात देखील नवनवे ग्राहक माहितीच्या जोरावरच निर्माण करण्यात कंपन्या अग्रेसर असतात.
सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राधिका भाटिवडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.