नागपूर : प्रतिनिधी
शिवसेना उपनेते आणि रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सामंत यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. नामदार सामंत यांनी सलग चौथ्यांदा मंत्री होण्याचा मान मिळवत रत्नागिरीच्या शिरपेचात तुरा खोवला आहे.
आज शपथ घेतल्यावर यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केलं ते म्हणाले की “महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आज नव्या सदस्यांनी राजभवन, नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये, राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची मी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मला दिलेली जबाबदारी मी अत्यंत नम्रपणे स्वीकारत असून लोकसेवेसाठी सदैव कटिबद्ध असल्याच सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ट्विट केलं आहे.
उदय सामंत हे २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग ५ वेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. उदय सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघात या काळात एकहाती पकड बसवली. जिल्ह्यात तळागाळात कार्यकर्त्यांची फौज तयार करणारे फार कमी नेते असतात. त्यात सामंत यांचा वरचा क्रमांक लागतो. रत्नागिरीत त्यांचा एकछत्री अंमल आहे. शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा हात असला तरी त्यांची राजकीय कारकिर्द राष्ट्रवादी पक्षातून झाली होती. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करुन त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्याच भाजपसोबत सत्तेत असताना मंत्रीपद भुषविले. सेना-भाजपचा मतदारसंघ म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने युवा नेतृत्व असलेल्या उदय सामंत यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी या संधीचे सोने केले. आमदार म्हणून ते विजयी झाले. दहा वर्षानंतर त्यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र केले आणि शिवसेनेचा भगवा हाती धरला. त्यानंतर ही त्यांची राजकीय घौडदौड कायम राहिली. अर्थात आजच्या घडीला सामंत म्हणजे सर्वकाही अशी ख्याती मतदारसंघात आहे.
सुरुवातीला आमदार, मग राज्यमंत्री, म्हाडा अध्यक्ष, उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि मग उद्योग मंत्री असा चढता क्रम त्यांचा राहिला आहे. यावेळी हाच चढता क्रम कायम राहील यात शंका नाही. आपल्यावर जी जबाबदारी मिळेल ती व्यवस्थित पार पाडायची, जे पद मिळेल त्याला न्याय द्यायचा, अशी ख्याती असल्याने ते राज्याच्या महत्वाच्या नेत्यांच्या पंगतीत कधी जाऊन बसले हेच विरोधकांना कळले नाही. अर्थात हा चढता आलेख कायम रहावा, यासाठी त्यांचे अपार कष्ट आणि मेहनत आहे.