रत्नागिरी : प्रतिनिधी
सध्याचा महत्व पूर्ण प्रश्न म्हणजे पर्यावरण संदर्भातील समस्या आणि याच आशयाने बालकांना, पालकांना निसर्गभान देणारा काव्य संग्रह म्हणून प्रा. सचिन सनगरे यांच्या कविता निश्चितपणे आश्वासक, अभ्यासपूर्ण आणि बालकांना आवडतील अशा आहेत. समर्पक चित्रांचा समावेश आणि चित्रे रंगविण्याची विशेष सोय यामुळे हा काव्य संग्रह सर्वत्र प्रसिद्ध होईल अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त करून डॉ. चित्रा मिलिंद गोस्वामी यांनी या बाल काव्य संग्रहास शुभेच्छा देऊन त्याचे प्रकाशन केले.
बालकांना सहज भावतील अशा शब्दात निसर्ग, पर्यावरण, पाने, फुले, पक्षी, प्राणी यांचे संबंधित कविता या काव्य संग्रहात आहेत. डॉ. तुळशीदास रोकडे यांनी या पुस्तकास प्रयोजिकत्व दिले, श्री. उमेश नामदेव मोहिते यांनी पुस्तक रचना, मुद्रण, मुखपृष्ठ व सुबक मांडणी करून बालकांसाठी अधिक सोयीचे बनविले. प्रकाशनपूर्व प्रतिसाद देणाऱ्या पालकांचे प्रा. सनगरे यांनी आभार मानले. सांग ना अग आई पासून ते हे विश्वच माझे घर इथ पर्यंत हा काव्य प्रवास सुलभ व वाचनीय आहे. पाऊस या कवितेचे काव्य वाचन डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले. या प्रसंगी प्रा. पंकज घाटे, डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. विनायक गावडे , मिलिंद गोस्वामी, सौ. स्मिता सनगरे उपस्थित होते. रत्नागिरीतील अनेक कवी, लेखक आणि सामाजिक संस्थांनी या बाल काव्य संग्रहास शुभेच्छा दिल्या आहेत.