प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल….हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक. लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.
माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्णाने तो स्वर्गीय वृक्ष लावला तिच्या दारी पण गम्मत म्हणजे त्यांचा सडा रुक्मिणीच्या द्वारी… असंच होतं नाही; आपल्याला वाटते पण ती चीज आपली नसतेच. असो….
संध्याकाळी पारिजातकाच्या कुंद कळ्या पाहिल्या की मन वेडावतं. इवलूशा त्या कळ्या इतक्या मोहक दिसतात म्हणून सांगू वाटतं की उमलूच नयेत त्या. आठवणींसारख्या…. उमलल्या की लगेच कोमेजतात… संध्याकाळचा गार वारा आपल्यासोबत त्या पारिजातकाचा सुगंध वाहून आणत असतो तेव्हा तर काय पुसता मनाची अवस्था! त्या सुगंधावर आरूढ होऊन मन कुठे कुठे फिरून येतं म्हणून सांगू? तो सुगंध खूप प्रसन्न असतो आणि चित्तवृत्ती पण प्रसन्न करतो. प्राजक्त प्रसन्न तर रातराणी मादक. फरक आहे दोघीत.
फुलांनी बहरलेला पारिजातक तर किती किती सुरेख दिसतो. खरं सांगायचं तर फारसा तो तसा तो कोणालाच दिसत नाही. कारण खूप सकाळी पहाटेच तो ते लेणं स्वदेहावरून उतरवून ठेवतो. रात्रीच जर चंद्रप्रकाशात पाहिलंत तर जणू सगळ्या तारका इथेच आल्यात चमचम करायला आणि सुवास दरवळवायला असच वाटतं. कसं वर्णन करू त्या दृष्याचं? खरंच कधी शक्य झालं तर नक्की पहा कारण काही गोष्टी या अनुभवाच्या असतात. तर हा प्राजक्त आसक्त ना होता आपला हा साज पहाटेच उतरवतो जणू आपल्याकडे आहे ते सगळं देऊन तो रिक्त होऊ पाहतोय. असंच काहीतरी माझंही आहे नाही का? स्त्री तरी काय वेगळं करते? पुल्लिंग प्राजक्त पण स्वभाव स्त्रीलिंगी…
प्राजक्ताचं खोड, पानं मात्र खरखरीत असतात. एवढ्या नाजूक फुलाला अंगाखांद्यावर खेळावणारे खोड आणि सोबत करणारी पानं का बरं खरखरीत? मी मलाच विचारलं अनेकदा… अरे पण माझंही तसच नाही का? सुकोमल मनाला जपणारा हा देह कुठे आहे सुकोमल किंवा सगळाच्या सगळा सुंदर, बेदाग? तसच तर काहीसं नसेल ना?
कधी केलाय का या पारिजातकाच्या फुलांचा हार तुम्ही? पण हा खूप लवकर वेचावी लागतात ही दवात असतात तोवरच. पावसाळ्यात तर पाऊस पडला की संपलेच सारे. ”कोमल बदन सह सके ना ये मार” असच काहीतरी होऊन बसतं पावसात. पाऊस सहन होत नाही आणि ऊन सुद्धा. मधलंच काहीतरी लागतं यांना. माझंही तसच आहे. कोणतेच टोक नाही झेपत आणि मोठी गंमत म्हणजे मध्य सापडत नाही. कसं असतं नाही? तर मूळ मुद्दा काय तर पारिजातकाच्या फुलांचा हार! खूप वेळ आणि खूप खूप फुलं ओवलीत ना की त्या देखाचा केशरी रंग दोऱ्याला आणि आपल्या बोटांना लागतो. खूप वेळ त्या फुलांचं अस्तित्व जाणवून देत असतं. असंच काहीसं जमलं करायला तर खरच माझ्याही जीवनाचा प्राजक्त होईल नाही का?
– उमा जोशी