दीड कोटी रुपयांचे २०० तोळे सोने लंपास
राजापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील मिठगवाणे येथील साखर श्रमिक पतपेढीची शाखा अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना घटली असून सकाळी शाखा उघडण्यासाठी आलेल्या शिपायाला शाखेच्या दाराची कडी कोयंडा तोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने संबंधितांना माहिती दिली आहे. शाखा व्यवस्थापकाकडून नाटे सागरी पोलीस स्थानकात तात्काळ तक्रार दाखल करण्यात आली.
घटनास्थळी नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक दाखल झाले आहेत.
रत्नागिरी येथून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी होते. शाखेतील सोने ठेवण्याचा लॉकर फोडण्यात आला असून त्यातील जवळपास २०० तोळे सोने चोरल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुसरा पैशाचा लॉकर मात्र तोडण्यात आलेला नसल्याची माहिती मिळाली आहे.
ही शाखा ही श्रीदेव अंजनेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच असून फारशी वर्दळ या भागात नसते. याचाच फायदा घेऊन पतपेढी फोडल्याचा संशय व्यक्त होत आहे. जवळपास दीड कोटी रुपयाचा हा डल्ला असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.




