घोळका म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो कोंडाळे करून गप्पा मारणाऱ्या १० -१२ जणांचा समूह. यात असणारे सगळेच जण काही समविचारी असतात असं नाही. पण ते तात्पुरत्या एखाद्या कारणासाठीसुद्धा एकत्र आलेले असू शकतात.
घोळक्यात बहुदा गप्पा, राजकारणाच्या किंवा क्रिकेटच्या चर्चा आणि अगदीच नाहीतर चित्रपट आहेतच.
अनेकदा अगदी नकळत आपण घोळक्यात सामावले जातो. आपली इच्छा असो नसो आपण घोळक्याचे नियम पाळायला लागतो. अनेकदा कृती केल्यानंतर आपल्याला जाणीव होते की आपण जे काही केले ते आपल्याला करायचंच होते असं नाही पण घोळक्यामुळे ते घडले. पण काही वल्ली अशाही असतात ज्या घोळक्यातही एकट्याच असतात.
काही घोळकेही असे असतात जे आपल्याला एकाकी पाडण्यात यशस्वी होतात. मग अशी व्यक्ती काय करते? घोळका बदलते? का स्वतःभोवती तटबंदी घालून घेते? का त्याच घोळक्यात पुन्हा मिसळण्याचा प्रयत्न करते?
बऱ्याचदा शेवटचा पर्याय वापरला जातो. पण असेही दिसून येते की यामुळे वातावरण अधिकच गढूळ बनते. घोळका बदलावा म्हटलं तर नवीन घोळक्यात पुन्हा तसंच घडणार नाही याची शाश्वती कोण देणार? आणि स्वतःभोवती तटबंदी उभारल्याने पुन्हा नुकसान आपलेच!

मग अशावेळी आत्मचिंतानाचा पर्याय समोर येतो. आपले कुठे चुकले ते पाहावे. लगेच चूक कबूल करावी क्षमा मागावी. पुन्हा तसाच प्रसंग घडला तर दक्षतेने वागावे आणि तरीही आपण स्वीकाराहार्य नसलो तर आपली बाजू दुसर्यांना फार समजावून देण्याच्या भानगडीत पडू नये. सगळं काळावर सोडून द्यावं. त्याच्याकडे सर्व गोष्टींवर उपाय असतो…..(?)
– उमा जोशी






Yes Good y