आ. राजन साळवी यांना मूळ शिवसेनेत येण्याची ऑफर
रत्नागिरी : प्रतिनिधी
भविष्यात लांजा-राजापूर मतदारसंघ महाआघाडीकडून कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजन साळवींनी प्रथम आपली सीट वाचवावी, असा सल्ला शिवसेना नेते किरण सामंत यांनी दिला आहे. याच मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी तयारीत असल्याचे सूतोवाच सामंत यांनी केले. त्यामुळे आता लांजा – राजापूर विधानसभा जागेवर किरण सामंत यांनी आपला दावा ठोकला आहे. दुसरीकडे राजन साळवी यांनी मूळ शिवसेनेत प्रवेश करावा, अशी ऑफरच किरण सामंत यांनी दिली.
शिवसेना नेते किरण सामंत यांचे कोकणात चांगले काम असून त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे. त्यामुळे अशा नेत्याला महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल, असे वक्तव्य आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पेव आले होते. साळवींच्या वक्तव्यावर किरण सामंत यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. मला खासदार करायचे कि नाही याचा निर्णय महायुती घेईल. मला खासदार बनवायला शिंदे, फडणवीस सक्षम आहेत. राजन साळवीनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी, असा मैत्रीचा सल्ला शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी दिला.