रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनार्यावरील प्रसिध्द अशा श्री झरीविनायक मंदिराचा जिर्णोध्दार सोहळा व श्री देव गणपती पुन:प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे, आ. किरण सामंत, आ. निलेश राणे, माजी आ. राजन साळवी, उद्योजक अण्णा सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
श्री झरी विनायक जिर्णोध्दार कार्यक्रमानिमित्ताने ७ एप्रिलपासून ११ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ९ एप्रिल गणेशाची व ११ एप्रिल रोजी हनुमंताची पुन:प्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी अष्ठोदत्त सहस्त्र कुंभाभिषेक हा धार्मिक सोहळा पुजकांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. यानिमित्ताने दि. ७ व ८ रोजी दुपारी १ ते ५ यावेळेत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ९ एप्रिल रोजी श्री झरीविनायक मंदिराचा कलशारोहण, मूर्तीची प्रतिष्ठापना व धार्मिक विधी सकाळी १०.२९ वा. सुरु होणार आहे. दु. १ ते रात्रौ १२ पर्यंत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. दु. १.३० वा. भजन तर सायंकाळी ७ ते १० यावेळेत महाराष्ट्राचा लोकप्रिय आवाज प्रथमेश लघाटे याचा संगितमय नजराना सादर होणार आहे. यावेळी हास्यकलाकार प्रभाकर मोरे व दत्तू मोरे यांचाही हास्य मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
दिनांक १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. होममिनिस्टर , ११ एप्रिल रोजी ९.२५ वा. हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दु. १ वा. महाप्रसाद होणार आहे. सायं. ७ वा. उत्सव माय मराठीचा हा मराठी भावगितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला समस्त रत्नागिरीकर भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन झरी विनायक मित्रमंडळ भाट्ये यांनी केले आहे.