रत्नागिरी : प्रतिनिधी
एमव्ही बीटू (Bitu) रिव्हर (River) या जहाजाचे पश्चिम आफ्रिकेमध्ये समुद्री चाच्यांनी अपहरण केले आहे. त्यावरील १० खलाशांना बंधक बनवले आहे. यामध्ये रत्नागिरीतील दोन तरुण, तर राज्यातील पाच जणांचा समावेश आहे. बंधक बनवलेल्या तरुणांबाबत कोणतीही माहिती त्यांच्या पालकांना मिळालेली नाही. ११ दिवस झाले तरी या चाच्यांची अजून कोणतीही मागणी नाही. त्यांच्याबाबत काळजी वाटत असून आम्ही तणावाखाली आहोत. या बंधकांना सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी आणि आम्हाला दिलासा द्यावा, अशी विनवणी बंधक असलेल्या मुलाचे वडील जावेद मिरकर यांनी केली. समीन मिरकर आणि रिहान सोलकर असे समुद्री चाच्यांनी बंधक बनवलेल्या तरुणांची नावे आहेत. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र सागरी मंडळाकडे (MMB), केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयालाही याबाबत माहिती दिली आहे; परंतु अजून काहीच कळत नाही, अशी माहिती जावेद मिरकर यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शब्बीर सोलकर, कॅप्टन फिरोज मजगावकर, कर्लेकर आदी उपस्थित होते.
शस्त्रधारी सुरक्षारक्षक नव्हते
अपहृत जहाज डांबरवाहू आहे. अतिशय धोकादायक भागातून हे जहाज जाते. त्यामुळे जहाजावरील खलाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जहाजावर आर्मगार्ड म्हणजे शस्त्रधारी सुरक्षारक्षक द्यावे, अशी मागणी केली होती; परंतु कंपनीला त्याचे गांभीर्य नसल्याने कंपनीने आर्मगार्ड दिले नाहीत. त्यामुळे समुद्री चाच्यांना प्रतिकार करता आला नाही. त्याचा फायदा घेऊन चाच्यांनी आमची मुलं बंधक बनवली, असा आरोपही मिरकर यांनी केला.
मिरकर म्हणाले, “या जहाजावर १७ मार्च २०२५ ला रात्री ७.४५ वाजता मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटाजवळ ४० नॉटिकल मैलावर चाच्यांनी हल्ला केला. यामध्ये जहाजावरील एकूण १८ लोकांपैकी १० खलाशांना बंधक बनवले. त्यापैकी ७ भारतीय आणि ३ रुमानियन आहेत. या बंधक खलाशांमध्ये रत्नागिरी येथील दोन तरुणांचा समावेश आहे. समीन जावेद मिरकर (OS) आणि रिहान शब्बीर सोलकर (ऑइलर) म्हणून काम पाहतात. दहा दिवसांपासून त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली ना महाराष्ट्र सागरी मंडळाच्या रत्नागिरी बंदर कार्यालयाला पत्र लिहून तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे.”
“शिपिंग महासंचालनालयाकडून (DG Shipping) किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून अद्याप कोणतेही अपडेट्स मिळालेले नाहीत. यामुळे आम्ही तणावात आहोत. आम्ही सर्व संबंधित व्यक्तींसह परराष्ट्र मंत्रालय, डीजी शिपिंग आणि महाराष्ट्राचे बंदर विकासमंत्री नीतेश नारायण राणे यांच्याशी तातडीने संपर्क साधून खलाशांच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्याची मागणी केली आहे. जहाज भारतातील मॅरिटेक टँकर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे संचालित आहे. या कंपनीचा परवाना (RPSL-MUM-१६२०३३) असून ती मुंबईतील गोरेगाव येथील लोटस कॉर्पोरेट पार्कमध्ये कार्यरत आहे.”