राजापूर : प्रतिनिधी
‘माझा शब्द हेच वचन!’ या उक्तीप्रमाणे धडाडीने कार्य करणाऱ्या शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी तालुक्यातील गोवळ व विलये येथे अर्जुना नदीवर पूल बांधकामासाठी २५ कोटी निधी मंजूर करून आणला आहे. हा निधी मिळवून देण्यासाठी रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय उद्योगमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी हातभार लावल्याने त्यांचे आमदार किरण सामंत यांनी आभार मानले आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष ओलांडली तरीही अर्जुना नदीवर गोवळ व विलये या गावांना जोडणारा पूल नव्हता. मात्र आमदार किरण सामंत यांनी ही बाब लक्षात घेऊन या पुलासाठी पाठपुरावा सुरू केला. या पुलामुळे येथील पंचक्रोशीला दळणवळणासह अनेक फायदे होणार आहेत. अर्जुना नदीपलीकडचा भाग डोंगराळ असून, त्या गावाकडे जाण्यासाठी पक्क्या स्वरुपाचा मार्ग नाही. त्यामुळे अर्जुना नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थ सातत्याने करीत आहेत. त्याबाबत आ. किरण सामंत यांच्याकडून शासनाकडे लेखी स्वरुपात पाठपुरावा केला गेला.
सुमारे हजार लोकसंख्या असलेल्या गोवळमधील शालेय विद्यार्थी विलये हायस्कूलला जातात. शिवाय रेशनिंगसह दैनंदिन खरेदीसाठीही डोंगर व विलयेला जावे लागते. गोवळ परिसरातील भाजीपालादेखील डोंगरमधील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जातो. तथापी या सर्वांना अर्जुना नदीवरील नसलेला पूल अडथळा ठरत होता. किरण सामंत आमदार झाल्यानंतर या पुलाला मंजुरी मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार ‘माझा शब्द हेच वचन!’ या उक्तीप्रमाणे धडाडीने कार्य करणाऱ्या शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी तालुक्यातील गोवळ व विलये येथे अर्जुना नदीवर पूल बांधकामासाठी २५ कोटी निधी मंजूर करून आणला आहे. आता हा पूल पूर्ण झाल्यावर ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे एकूणच येथे समाधानाचे वातावरण आहे.