रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यात लवकरच औद्योगिक क्रांतीला सुरुवात होणार असून, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. रिळ-उंडी येथे संरक्षण विभागाचा रणगाडे निर्मिती कारखाना, निवेंडीत मँगो आणि कॅश्यू पार्क आणि वाटद येथे अंबानी ग्रुपचा डिफेन्स क्लस्टर असे तीन प्रदूषणविरहित प्रकल्प या भागात उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांमुळे स्थानिक तरुणांचे मुंबई-पुणे येथील स्थलांतर थांबणार असून, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
रिळ-उंडी येथे निबे कंपनीच्या सहकार्याने संरक्षण विभागासाठी रणगाडे बनवणारा कारखाना उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २०५.०२३२ हेक्टर जमीन संपादित होणार असून, त्यासाठी २५४ कोटी ९४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे संरक्षण क्षेत्राला बळकटी मिळेल आणि स्थानिकांना तांत्रिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता निवाड्याच्या टप्प्यावर आहे.
निवेंडी येथे मँगो आणि कॅश्यू पार्क उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १०४.०१ हेक्टर जमीन संपादित होणार असून, १४४ कोटी ९९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. एमआयडीसीकडे या निधीची मागणी प्रशासनाने केली आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरीतील आंबा आणि काजू उत्पादकांना एकत्रित व्यासपीठ मिळणार आहे. फळ प्रक्रिया उद्योग एकाच ठिकाणी सुरू होणार असल्याने व्यावसायिकांना फायदा होईल आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल.
वाटद येथे अंबानी ग्रुपचा डिफेन्स क्लस्टर प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी पाच गावांतील जमीन संपादन प्रस्तावित असून, तीन गावांचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हा प्रकल्प संरक्षण क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणारा ठरणार असून, स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध करून देईल.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या दाओस दौऱ्याचे फलित म्हणून हे तीन मोठे प्रकल्प रत्नागिरी तालुक्यात येत आहेत. या प्रकल्पांसाठी आवश्यक सर्व्हे पूर्ण झाला आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जमिनीला एकरी ४५ लाख रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे, जो बाजारमूल्यापेक्षा चार ते पाचपट जास्त आहे. या प्रकल्पांमुळे रत्नागिरी तालुक्यात औद्योगिक क्रांतीला सुरुवात होणार आहे. प्रदूषणविरहित उद्योगांवर भर देण्यात आल्याने पर्यावरण संतुलन राखले जाईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल हे मात्र नक्की !