रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रे रत्नागिरीकडे रवाना झाली. १९४२ मतदान केंद्रावरील सर्व मतदान यंत्रे रत्नागिरी नजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील भारतीय अन्न महामंडळाच्च्या गोदामात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या गोदामाला त्रिस्तरीय सुरक्षाकवच ठेवण्यात आले आहे. या गोदामात ४ जूनपर्यंतजिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामधील सहा विधानसभा मतदार संघात १९४२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान यंत्र सील करण्यात आली. ही मतदान यंत्रे गाड्यांमधून रत्नागिरीकडे पाठवण्यात आली. रत्नागिरी एमआयडीसी येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही सर्व मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. परवा रात्रीपासून मतदान यंत्रे रत्नागिरीत यायला सुरुवात झाली. सिंधुदुर्गातून मतदान यंत्रे रत्नागिरीत यायला काल दुपार झाली होती. सावंतवाडीतील मतदान यंत्रे ८ रोजी दुपारनंतर रत्नागिरीत पोहचली. भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील सर्व मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. या गोदामाभोवती कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गोदामात त्रिस्तरीय सुरक्षाकवच असणार आहे. सर्वात आतमध्ये सीआरपीएफची एक फलटण असेल. या पथकामध्ये एक अधिकारी आणि तीस कर्मचारी असतील. दुसऱ्या स्तरामध्ये राज्य राखीव दलाचे एक पथक असेल. त्या पथकामध्ये तीस कर्मचारी आणि एक अधिकारी असतील. गोदामाच्या बाहेरच्या आवारात स्थानिक पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामध्ये दहा पोलीस कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. चौवीस तास आळीपाळीने हा बंदोबस्त राहणार आहे.




