केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जनतेला सवाल, इंडी आघाडीवर हल्लाबोल
रत्नागिरी : प्रतिनिधी
देशातील इंडिआघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. त्यांच्या आघाडीत सगळे भ्रष्टाचारी भरले आहेत. काँग्रेस स्वा. सावरकर यांच्यावर टीका करते त्याचसोबत उद्धव ठाकरे जाऊन बसले. सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेस सोबत आघाडी करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला रत्नागिरीची जनता निवडून देणार का? अशा शब्दात जोरदार हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या ग्राऊंडवर विशाल सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी इंडि आघाडीवर जोरदार निशाणा साधला. या सभेवेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चित्रताई वाघ, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दिपक केसरकर, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे संचालक किरण सामंत, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार बाळ माने, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अमित शहा म्हणाले की, मागील दहा वर्षात आपल्या देशात बॉम्ब हल्ले झाले नाहीत. आतंकवादी हल्ले झाले नाहीत. ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. ट्रिपल तलाक चा निर्णय घेतला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात आमचे सरकार आले तर हे निर्णय आम्ही परत मागे घेऊ. देशात कोरोनाचे संकट आले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहीम सुरू केली. आणि त्याच लसीकरण मोहिमेवर राहुल गांधी यांनी टीका टिपण्णी केली होती. नंतर तेच गुपचूप जाऊन लस घेऊन आले. त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे आघाडी सोबत गेले. कोरोनाच्या संकट काळात गरिबांची खिचडी खाण्याचा घाट उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केला. उद्धव ठाकरे जी आपण बाळासाहेबांचे पुत्र आहात. पण त्यांच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे, नारायण राणे आहेत. औरंगाबादचे नामकरण करताना इंडिया आघाडी, शरद पवार यांनी विरोध केला होता. आत्ताची इंडि आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन पार्टी आहे अशा शब्दात केंद्रीय lमंत्री अमित शहा यांनी जोरदार निशाणा साधला.




