अरबी समुद्राचा किनारा, विविध ऋतूंमध्ये साजरे होणारे नयनरम्य निसर्गसोहळे आणि खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असणारे, मुख्यत्वाने ग्रामीण भागात वसलेले, भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपती शिव-शंभूराजांच्या पराक्रमांच्या गाथांनी अभिमंत्रित झालेले कोकण संपन्न तर आहेच. सोबतच येथील माणसांमध्ये आजही जिव्हाळा आणि प्रेम भरभरून पहायला मिळते. एकूणच हा भाग निसर्गसंपन्न आणि सामाजिक समरसतेच्या दृष्टीने समृद्ध आहे.
शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा या समस्याa येथील लोकांना मागील अनेक वर्षांपासून त्रासदायक ठरत आहेत. अनेक धुरिणांनी यावर तन-मन-धन अर्पून काम केले असले तरीही भौगोलिक कारणांमुळे हे प्रयत्न पुरेसे ठरलेले नाहीत. यामुळे इतर भागांच्या तुलनेत सर्वाधिक संपन्नता उपजत लाभली असतानाही ‘कोकणात रहातो हेच मोठे कष्ट’ असे सर्रास बोलले-ऐकले जाते.
मुख्यमंत्री म्हणून कोकणचा सुपूत्र नारायण राणे सिंहासनारूढ व्हावा अशी इच्छा हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आणि पुढे मुख्यमंत्रीपदावर विराजमान केले हीच गोष्ट ना. नारायणराव राणे साहेबांचे कार्यकर्तृत्व सांगण्यासाठी पुरेशी आहे. शांत स्वभावाचे स्वर्गीय जोशी सर पदावरून खाली आल्यानंतर त्यांच्या जागी टोकाचा आक्रमक पण कमालीचा प्रामाणिक माणूस देणे हे त्याकाळी फक्त बाळासाहेबांना शक्य होते; आणि तेच आता मोदीजींनीही साध्य केले.
दादासाहेब एक कार्यकर्ता, नेता म्हणून कर्तृत्ववान आहेत ही गोष्ट त्यांच्या काळातील दोन महान नेत्यांशी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या संबंधांवरून स्पष्ट होते. तर त्यांचा धाक, दरारा आणि त्यांची परिस्थिती हाताळण्याची क्षमता यांबाबत त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना अप्रूप वाटते. आजही त्यांच्या संसदेतील भाषणादरम्यान गोंधळ घालण्यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर काम करणारे विरोधी पक्षांचे नेते अनेकदा विचार करतात.
असा ताकदीचा नेता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी मा. मोदीजींनी दिला तेव्हाच एक गोष्ट निश्चित झाली; ती म्हणजे कोकणच्या मूलभूत विकासाचा प्रश्न येत्या ५ वर्षांमध्ये त्यांना सोडवायचा आहे. देशाचा सर्वोच्च नेता ज्यावेळी हे व्हिजन समोर ठेवून काम करतो त्यावेळी कार्यकर्ते सोडाच, सर्वसामान्य जनताही त्या दिशेने कामाला लागते. उंचसखल सह्याद्री आणि विस्तीर्ण समुद्रामध्ये विकासाची नवी आशा प्रवाहीत करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र साक्षात नारायणाला जबाबदारी सोपवत असताना मतदार बांधवांनी “विष्णूमय (नारायण) जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ” या संतशिरोमणी तुकोबारायांच्या शिकवणीला अनुसरून आपल्या स्तरावर कामाला सुरुवात केलीसुध्दा.
राणे साहेबांचा कामाचा उरक, काम करण्याची पद्धत यांमुळे मोदीजी त्यांच्यावर खुश आहेत ही गोष्ट काही काळासाठी बाजूला ठेवली तर दादासाहेब ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत काम करतात त्यांनाही काम करताना अनेक गोष्टी नव्याने शिकायला मिळतात असा अनुभव आहे. तंत्रज्ञानाचा अत्यंत सजग वापर करणारे दादासाहेब राष्ट्रीय स्तरावर काम करताना अनेक समस्या लीलया सोडवतात. अनेक ठिकाणी त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा लाभ घेतल्याने समस्या क्षणार्धात सुटली असल्याचे अनेक प्रशासनिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
“नेहमीच ध्यानीमनी कोकणचा विचार व्यथित करतो” असे म्हणणारे दादासाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात अग्रणी राहिले. रत्नागिरीशीही त्यांचे घट्ट नाते आहे. मात्र त्यांनी थेट कार्य करावे आणि रत्नागिरीच्या विकासात योगदान द्यावे अशा संधी फारच थोड्या आल्या. नाही म्हणायला १९९९ साली बाळासाहेब माने यांच्या रुपात कर्मठ, निष्ठावान आणि कार्यप्रवण आमदार युतीच्या माध्यमातून विधानसभेत जावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही बाळासाहेब कृतज्ञ भावाने सभांमध्ये सांगतात.
आता रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासाची गॅरंटी मा. राष्ट्रभूषण प्रधानसेवक ना. नरेंद्रभाई मोदीजींनी दिली आहे. याच गॅरंटीच्या प्रतिपूर्तीसाठी एक भक्कम, कणखर, आक्रमक आणि दूरदृष्टीने काम करणारा खासदार संसदेत येणे गरजेचे आहे हे जाणून दादासाहेबांच्या खांद्यावर लोकसभा निवडणूक लढवण्याचे आणि जिंकण्याचे शिवधनुष्य सोपवले. यामुळे आता दादासाहेब आपल्या स्टाईलमध्ये दिमाखदार अंदाजात मोदी सरकारच्या माध्यमातून कोकणचा रखडलेला विकास पूर्ण करतील, समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि कोकणी माणसाचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी रोजगार आणून मोठा दिलासा देतील अशी खात्री जनमानसांत दृढ होत आहे.
– योगेश मुळे, संगमेश्वर.