रत्नागिरी शहरात गोवंश, गोमाता हत्या आणि तस्करी होत असताना पोलिसांना ते सापडू नये, याचे आश्चर्य वाटते. रत्नागिरीत एका टेम्पोतून गोवंशाची कापलेली मान रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडल्यावर हिंदुत्वनिष्ठ जनता पोलीस ठाण्यात येऊन जाब विचारू लागली. अश्या घटना घडताना पोलीस यंत्रणा सुशेगाद कशी राहू शकते? वाहतूक करताना बंदिस्त गाड्यांची तपासणी का केली जात नाही? केली जात असेल तर अश्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यास पोलीस यंत्रणा कुचकामी ठरतेय का? की कोणाच्या दबावात यंत्रणा काम करत आहे? असे अनेक सवाल जनतेच्या मनात आहेत.
रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर गोहत्या आणि मांसाची वाहतूक होत आहे. गेले तीन महिने काही सुजाण नागरिक पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. आवश्यक ती माहिती ही देत आहेत. परंतु अद्यापही ठोस कारवाई झाली नाही. दरम्यान टीआरपीनजीक घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार नाकाबंदी करण्यात आली असून नवनिर्माण कॉलेजच्या इथून हा टेम्पो गेल्याचे प्रथमदर्शनी पाहणाऱ्या लोकांनी सांगितले. घटना घडल्यावर नाकाबंदी करणारे पोलीस आधीच तपासणी का करत नव्हते? हा सवाल आहे. जर आधीच तपासणी केली असती तर अश्या वाहतूक करणाऱ्या गाड्या पोलिसांच्या नजरेतून कश्या सुटतात? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. नागरिक तीन तीन महिने माहिती पुरवत असताना पोलीस कारवाई का करत नाहीत? याचे उत्तर कुलकर्णी कधी देणार याची वाट जनता पाहत आहे. सध्यातरी पोलिसांचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल विचारावा लागतोय. कारण अवैध सावकारी असो, अवैध मटका धंदा असो, अवैध दारू धंदे असोत, अवैध गो मांस तस्करी असो यात कुठेही पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. ते कारवाई करताना दिसले असते तर जनतेला हा प्रश्न पडला नसता!
मिरजोळे औद्योगिक वसाहतीच्या करबुडे मार्गावर एका चढावाआधी एका निरासग वासराचे मुंडके रस्त्यावर पडलेले आढळले. हा बेशरमपणा म्हणजे माणुसकीला कलंक आहे.
गोमांस मिळालेल्या,वाहतूक करतांना पकडलेली वाहने,काही व्यक्ती गेल्या बारा वर्षात अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. हे सारे मूळ धरायला कोण आहेत तर पोलिस. कारण खरतर जागोजागी चेकपोस्ट असताना ही अवैध बिनदिक्कत वाहतूक अडवून द्यायला,अशा गाड्या पकडायला यांना गोरक्षक लागतात. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हे चित्र आहे. मागील दहा वर्षात डॉ. मुंढे जिल्हा पोलिस अधीक्षक असताना हा अघोरी निर्दयीपणा सुरु झाला. ते गोरक्षक हिंदू राष्ट्र व अन्य हिंदू संघटनाचे प्रतिनिधी बोलवित बैठक घेत पण कारवाई नाहीच! त्यांच्या कारकीर्दीत अशी प्रकरणे वाढली. डिवाएसपी गणेश इंगळे, शहर पोलिस निरिक्षक अनिल विभुते या सर्वांच्या कारकीर्द तपासायला हवी. हेच नाही तर नशेली गांजा,चरस अफू अजूनही पोलिस स्थानकाच्या हाकेवर विक्री होते. त्यावर कारवाई का होत नाही? पोलिसांनी फक्त कुणाची तक्रार आल्यावर कारवाई करायची का? हा सवाल आहे. असो. सकल हिंदू समाज आज एकवटतो आहे, ही बाब स्तुत्य आहे. परंतु हिंदूंनी मोर्चा, ठिय्या केल्यावरच कारवाई होणार आहे काय ? बाकी पोलीस सिनेमात दाखवतात तशी ॲक्टिंग करणार आहेत का?
पोलिसांची चेकपोस्ट काय करतात हे पाहणे संशोधनाचा मुद्दा आहे. अनेक ठिकाणी गाड्या न तपासता केवळ ड्युटी म्हणून कामावर आलेले पोलीस दिसतात. जिल्ह्यात ठिकठिकाणी हाच प्रकार आहे. कदाचित जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचा धाक राहिलेला नसावा. कारण कुलकर्णी रुजू झाल्यापासून अवैध वाहतूक, अवैध धंदे, अवैध तस्करी याबाबत कारवाई झालेली नाही. जी कारवाई केली असे दाखवले, त्यात पण संशय घेता येईल असे वातावरण आहे. खरच या पोलीस यंत्रणेवर कोणा भाई, भैय्या, अण्णा, आबा, दादा, बडे मियां, छोटे मिया यांचा दबाव आहे काय? हे केवळ पोलीस आणि त्यांच्या आत्म्याला ठाऊक!





