
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी रत्नागिरीच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट भाजप नेते नितेश राणे यांच्यासोबत जाऊन आपली उमेदवारी मागे घेतली. या धक्कादायक राजकीय यू-टर्नमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळ माने यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. या माघारीमुळे महायुतीचे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘पॉलिटिकल गेम’ बाळ माने यांनी ऐनवेळी घेतलेली माघार आणि पुन्हा भाजपच्या उंबरठ्यावर जाण्याची केलेली तयारी, हा केवळ एक राजकीय निर्णय नसून रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणातील अत्यंत पद्धतशीरपणे आखलेली व्यूहरचना (Strategy) असल्याचे दिसते.
उदय बने यांचा पत्ता कट : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी रत्नागिरीत उदय सामंत (शिंदे गट) यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कट्टर शिवसैनिक उदय बने यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, नेमक्या त्याच वेळी बाळ माने यांनी भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केला आणि उदय बने यांचे तिकीट कापले गेले.
उदय सामंतांसाठी राजकीय सोय? : बाळ माने यांच्या प्रवेशामुळे महाविकास आघाडीचा पारंपरिक मतदार विभागला गेला, ज्याचा थेट फायदा उदय सामंत यांना झाला. आता विधानपरिषदेलाही पक्षाला ऐनवेळी धोका देत माने यांनी महायुतीचा अजेंडा पूर्ण केला आहे. त्यामुळे माने यांचा ठाकरे गटातील प्रवेश हा मुळात उदय बने यांना रोखण्यासाठी आणि उदय सामंत यांचा पराभव टाळण्यासाठीच होता की काय, अशी दाट शंका आता उपस्थित केली जात आहे.
विनायक राऊत नेमके कुणाचे? : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या राजकारणात विनायक राऊत यांची भूमिका सातत्याने संशयाच्या भोवऱ्यात राहिली आहे. बाळ माने यांना ठाकरे गटात आणण्यात आणि उदय बने यांचे तिकीट कापण्यात विनायक राऊत यांची मोठी भूमिका होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एका बाजूला विनायक राऊत हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात; पण दुसऱ्या बाजूला रत्नागिरीत उदय सामंत यांच्याशी असलेले त्यांचे ‘सलोख्याचे’ संबंध नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. विधानसभा निवडणुकीत तगडे आव्हान देऊ शकणाऱ्या उदय बने यांना बाजूला सारून बाळ माने यांना उमेदवारी देणे, आणि आता बाळ माने यांनी ऐनवेळी मविआला धोका देणे, या सर्व घडामोडींमुळे “राऊत यांनी सामंतांसाठी राजकीय सोय तर करून दिली नाही ना?” अशी शंका कार्यकर्त्यांमधून उपस्थित केली जात आहे. त्यामुळे उघडपणे ठाकरेंसोबत दिसणारे विनायक राऊत छुपेपणाने सामंतांचे हित जपत आहेत की काय, असा संभ्रम शिवसैनिकांत निर्माण झाला आहे.



