महाराष्ट्राच्या विधिमंडळात सध्या जे काही घडत आहे, ते पाहता एकच प्रश्न पडतो: आपले लोकप्रतिनिधी लोकांच्या व्यथा मांडायला सभागृहात जातात की आपापसात हाणामारी करायला? भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील विचित्र आणि लाजिरवाण्या वादामुळे हीच शंका अधिक गडद झाली आहे. लोकशाहीच्या या मंदिरात सुरू असलेला हा राडा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लागलेला डाग आहे.
या वादाची ठिणगी पडळकरांच्या एका वक्तव्याने पडली, ज्यात त्यांनी ख्रिस्ती समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावर आव्हाडांनी पडळकरांवर कारवाईची मागणी केली. पण ही तर फक्त सुरुवात होती. त्यानंतर बुधवारी, १६ जुलै रोजी, विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर पडळकरांच्या गाडीचा दरवाजा आव्हाडांच्या एका कार्यकर्त्याला लागल्याचा आरोप झाला आणि मग सुरू झाली शिवीगाळ आणि घोषणाबाजीची नीच पातळी. आव्हाडांनी पडळकरांना ‘मंगळसूत्र चोर’ म्हटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ती मस्ती जनतेने पाहिली आहे. पडळकर यांना उद्देशून किडे करायचे आणि मग पडळकर यांनी प्रतिकार केला की नौटंकी करायची, हा धंदा आव्हाड यांनी सोडायला हवा!
खरी लाजिरवाणी घटना घडली गुरुवारी, १७ जुलै रोजी. विधिमंडळाच्या लॉबीमध्येच गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना झोडपले. हे काय चाललंय? लोकप्रतिनिधी म्हणून निवडले गेलेले हे लोक, विधानभवनाच्या पवित्र आवारात गुंडागर्दी करत आहेत. याचे व्हिडिओ पाहून सामान्य माणूसही थक्क झाला आहे. आव्हाड आरोप करत आहेत की त्यांना मारण्यासाठी गुंड आणले होते, तर पडळकर खेद व्यक्त करत आहेत. पण यातून विधिमंडळाची प्रतिमा धुळीला मिळाली आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. आव्हाड जितकी नौटंकी करताना दिसत होते, ते काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत! प्रखर हिंदुत्ववादी अनंत करमुसे यांच्यावर मारहाणीचे फटके मारलेले पाठीचे छायाचित्र अजून लोकांच्या डोळ्यापुढे आहे. त्या तुलनेत ही धक्काबुक्की किरकोळ आहे, हे नक्की!
या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत कारवाईचे आदेश दिले असले, तरी प्रश्न उरतोच, ही वेळ का यावी लागली? लोकप्रतिनिधी सभागृहात जातात ते आपापल्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी. बेरोजगारी, शेतीचे प्रश्न, महागाई, पायाभूत सुविधांचा अभाव – हे प्रश्न सोडून आपले आमदार विधानभवनाच्या आवारात एकमेकांच्या उरावर बसून आखाडा करत असतील, तर महाराष्ट्राच्या जनतेने कोणाकडे पाहावे?
जितेंद्र आव्हाड यांनी “आमदार सुरक्षित नसतील तर कशाला आमदार राहायचं?” असा सवाल केला. पण मग जनतेने काय विचारायचं, “लोकांचे प्रश्न घेऊन जाणारे आमदारच जर आपापसात मारामारी करत असतील, तर आमचं संरक्षण कोण करणार?” या घटनेनंतर आव्हाडांच्या कार्यकर्त्याला अटक करण्याचा प्रयत्न झाला, तर आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवून आंदोलन केलं. हे सगळं महाराष्ट्राच्या इतिहासात एका काळ्या अध्यायासारखं नोंदवलं जाईल.
राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की, लोकप्रतिनिधित्व ही केवळ सत्ता आणि स्वार्थासाठी नाही, तर ती सामाजिक जबाबदारी आहे. विधिमंडळ हे चर्चेचं, वादविवादाचं आणि लोकहिताचे निर्णय घेण्याचं ठिकाण आहे, कुस्तीचा आखाडा नाही. या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. ही वेळ आता एकमेकांवर चिखलफेक करण्याची नाही, तर महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विचार करण्याची आहे. हे लोकप्रतिनिधी कधी सुधारणार, आणि विधिमंडळात कधी लोकांच्या व्यथा मांडल्या जाणार, हाच खरा प्रश्न आहे!





