मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव आणि इतरांविरोधात लोकमान्य तिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश कांतीलाल जैन यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ते मरिन ड्राईव्हचे रहिवाशी असून ते सोन्याचा व्यवसाय करतात. त्यांनी बुधवारी तक्रार दाखल केली आहे. शैलेश कांतीलाल जैन हे त्यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये वैभव ठक्कर याच्यासोबत व्यवहार करत होते. याच दरम्यान अविनाश जाधव, त्यांचा चालक आणि इतर पाच ते सहाजण सुरक्षारक्षकासह बळजबरीने शॉपमध्ये आले.
जैन यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. ते म्हणाले की, अविनाश जाधव त्यांच्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. तसेच पाच कोटी दिले नाहीत तर मुलाला घेऊन जाण्याची धमकी दिली. जैन यांच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीमध्ये सर्व प्रकार कैद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फूटेज तपासले जात असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८५ ( खंडणी वसूल करण्यासाठी एखाद्याला धमकी देणे), कलम १४३ (बेकायदेशीर कृत्य), कलम १४७ (दंगल घडवण्याचा प्रयत्न करणे), कलम ३२३ (स्वेच्छेने इजा पोहोचवणे) आणि कलम १२०-बी (कट रचणे) इत्यादी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वैभव ठक्कर आणि अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.