राजापूर : प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनासोबतच कृषी समृद्धीला चालना देण्याच्या उद्देशाने राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिवसेनेच्या सर्व शाखाप्रमुखांना फळशेतीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी पाच फणसाच्या कलमांचे वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवार, दि. २ जून रोजी पाचल येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विशेष कार्यक्रमातून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले यांनी दिली.या कार्यक्रमात स्थानिक हवामानाला पूरक आणि भविष्यात चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या दर्जेदार फणस कलमांचे वितरण करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच फळशेतीचा प्रसार करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
केवळ घोषणा करून पर्यावरणाचे संरक्षण होणार नाही, तर प्रत्येकाने प्रत्यक्ष कृतीतून त्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे. शाखाप्रमुख हे तळागाळातील जनतेशी थेट जोडलेले असतात. त्यांनी स्वतःच्या शेतात किंवा अंगणात ही झाडे लावून फळशेतीचा आदर्श निर्माण केल्यास त्याचा सकारात्मक प्रभाव संपूर्ण गावावर पडेल. – आ. किरण सामंत
सध्या वाढती जंगलतोड आणि पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल ही चिंतेची बाब बनली आहे. त्याचवेळी शेतीतील वाढता खर्च आणि कमी उत्पन्न यामुळे युवा पिढीचा शेतीकडे असलेला कल कमी होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना निसर्ग आणि शेतीशी जोडणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून पर्यावरण संवर्धन आणि कृषी विकासाचा समन्वय साधणारा हा उपक्रम आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




