राजापूर : प्रतिनिधी
शहरातील नागरिक व वाहनचालकांना दिलासा देणारे काम गणेशोत्सवाच्या अगोदर पूर्ण झाले आहे. चौगुले फार्मसी ते शिवस्मारक या दरम्यान पेव्हर ब्लॉक बसवून खड्ड्यांची समस्या दूर करण्यात आली, तर रानतळे रस्त्यावरील खड्ड्यांवर काँक्रिटीकरण करून वाहतुकीसाठी रस्ता सुयोग्य करण्यात आला आहे. या संपूर्ण उपक्रमामागे आमदार किरण तथा भैय्या सामंत यांचा थेट पुढाकार आहे.
पावसाळ्यातील खड्ड्यांबाबत नागरिकांकडून होत असलेल्या तक्रारी आमदार सामंत यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी नगर परिषद प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. मुख्याधिकारी तुषार बाबर, अधीक्षक जितेंद्र जाधव आणि अभियंता रणवीर देसाई यांच्यासह बैठका घेऊन त्यांनी उपाययोजनांवर लक्ष ठेवले. परिणामी स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला आणि आगामी गणेशोत्सवाच्या आधी शहरातील प्रमुख रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत.
कामामुळे काही दिवस वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आमदार सामंत यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गणेशोत्सव हा राजापूरकरांसाठी भावनेचा उत्सव आहे. नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय सण साजरा करता यावा यासाठी हे काम हाती घेतले, असे आमदार सामंत यांनी सांगितले.नगर परिषदेनेही गणेशोत्सवापूर्वी शहर सज्ज करण्याचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा दिला असून येत्या दिवसांत उर्वरित रस्त्यांवरील खड्ड्यांचीही दुरुस्ती केली जाणार आहे.




