रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील विविध ठिकाणी गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच सुरक्षिततेसाठी लावलेली सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा अक्षरशः बिनकामाची ठरत असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी कॅमेरे बंद अवस्थेत आहेत, तर काहींच्या प्रतिमा इतक्या धूसर आहेत की गुन्हेगारांची ओळख पटवणे अशक्य ठरते. परिणामी पोलिस तपासात गंभीर अडथळे येत असून गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. त्यामुळे यंत्रणा सुधारण्याचे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यापुढे आहे.
शहरातील मुख्य चौक, महत्त्वाचे रस्ते, बसस्थानक आणि बाजारपेठांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र त्यातील अनेक कॅमेरे बंद असून, काहींमध्ये केवळ धूसर प्रतिमा दिसतात. पोलिसांकडून गुन्ह्यांचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जाते, मात्र बहुतांश वेळा फुटेज न मिळाल्याने तपासाचा वेग मंदावतो.
गेल्या काही महिन्यांत चोरी, मोबाईल हिसकावणे, वाहनचोरी अशा अनेक घटना घडल्या असून, त्या प्रकरणांमध्ये पोलिसांना स्पष्ट फुटेज न मिळाल्याने गुन्हेगारांना ओळखणे अवघड झाले. नागरिकांतूनही या यंत्रणेवर नाराजी व्यक्त होत असून, “घटना घडल्यानंतर पोलिसांकडे गेल्यावर कॅमेरा बंद होता असं उत्तर मिळतं, मग अशा यंत्रणेचा काय उपयोग?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नगरपरिषदेकडे या यंत्रणेची देखभाल आणि व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. मात्र नियमित देखभाल न केल्यामुळे आणि दुरुस्ती न केल्यामुळे अनेक कॅमेरे निष्क्रिय झाले आहेत. या बाबत पोलिसांकडूनही वेळोवेळी तक्रार करण्यात आली असून, नवीन कॅमेरे बसवण्याची गरज असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही यंत्रणा आधुनिक आणि स्पष्ट प्रतिमा देणारी असावी, त्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असावा आणि नियमित देखभाल व्हावी, अशी मागणी होत आहे.



