मुंबई : प्रतिनिधी
भारतीय रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंग प्रक्रियेत मोठे बदल करत नव्या नियमांची अंमलबजावणी केली आहे. आता तत्काळ तिकिट ऑनलाइन बुक करताना प्रवाशाला आपल्या IRCTC खात्यात लिंक केलेल्या आधार क्रमांकावर आलेला OTP टाकणे अनिवार्य असेल. या पद्धतीमुळे तिकिट दलाल आणि बोगस एजंट्सना आळा बसेल, असा सरकारचा दावा आहे.
रेल्वेच्या नव्या आदेशानुसार, तत्काळ तिकिट बुकिंग सुरु झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांपर्यंत कोणत्याही एजंटला तिकिट बुक करता येणार नाही. म्हणजेच AC तिकिट बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते, त्यानंतर अर्धा तास – 10.30 वाजेपर्यंत – फक्त सामान्य प्रवासीच तिकिट बुक करू शकतील. तसेच नॉन-AC साठी हेच नियम सकाळी 11 ते 11.30 दरम्यान लागू राहतील.
हे नियम IRCTC च्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपसह रेल्वे स्टेशनवरील काउंटर बुकिंगवरही लागू होतील. काउंटरवर तिकिट बुक करताना सुद्धा प्रवाशाला आधार क्रमांक द्यावा लागेल आणि त्या क्रमांकावर आलेला OTP तपासूनच तिकिट बुक होईल. दुसऱ्याच्या नावाने तिकिट काढताना देखील संबंधित प्रवाशाचा आधार क्रमांक आणि OTP आवश्यक असेल. त्यामुळे केवळ खरे प्रवासीच तिकिट बुक करू शकतील, ही खात्री केली जाणार आहे.
या नियमांतर्गत केवळ तत्काळ तिकिटांवर आधार OTP बंधनकारक आहे. इतर सामान्य तिकिट, वेटिंग यादी किंवा RAC साठी हे बंधन लागू नाही. जर कोणाला आधार लिंक करण्यात अडचण येत असेल, OTP येत नसेल, किंवा दुसरी तांत्रिक समस्या उद्भवत असेल तर IRCTC हेल्पलाइन 139 किंवा UIDAI च्या 1947 क्रमांकावर संपर्क साधता येईल.
रेल्वेने यासोबतच प्रवाशांसाठी एक नव्या प्रकारचा तिकिट बुकिंग पर्यायही सुरू केला आहे — AskDISHA 2.0 नावाचा AI आधारित चॅटबॉट. यामध्ये प्रवासी त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून हिंदी, इंग्रजी, गुजराती किंवा इतर भाषांमध्ये तिकिट बुक व रद्द करू शकतात. या सेवेकरिता IRCTC पासवर्डची आवश्यकता नाही, जेणेकरून तांत्रिक अडचणींशिवाय तिकिट बुकिंग अधिक सुलभ होईल.
नवीन नियम संपूर्ण भारतभर लागू होत असून, दिल्ली-मुंबईपासून ते कोलकाता-चेन्नईपर्यंत सर्व झोनमध्ये एकसारखा वापर केला जाईल. या पावलामुळे प्रवाशांना अधिक पारदर्शक आणि सुरक्षित तिकिट बुकिंग सेवा मिळेल, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.