रत्नागिरी : प्रतिनिधी
एसटी महामंडळाच्या कारभाराचे अनेक नमुने पुढे येत आहेत. त्यात अलीकडे निघालेल्या एका पत्रातील मजकूर वाचल्यास कारभारात किती बिनडोकपणा आहे हे उघड होत आहे. नुकतेच एक पत्र मार्गतपासणी पथकाला काढण्यात आले आहे. त्या पत्रातून अक्षरश: या पथकाला धमकीच दिली आहे. काहीही करा आणि वाहक आणि चालकांवर ठपका ठेवा. त्यांच्या केसेस करा, टार्गेट पूर्ण करा आणि असे केलात तरच तुमचे कार्य चांगले! (त्याबद्दल आम्ही अभिनंदन करू आणि व्हॉटसॲप ग्रुपवर टाळ्या पिटू!) तेव्हा कारवाई कराच असा त्या पत्राचा मजकूर दिसतो! असे बिनडोकपणाचे (दुसऱ्याचे डोके वापरल्याचा परिणाम) पत्र विभागीय वाहतूक अधिकारी रत्नागिरी यांनी काढले आहे. यामागे सूत्रधारही दुसऱ्यांच्या विकेट काढण्यात माहीर असलेला सचिनच असल्याचे बोलले जात आहे.
असे पत्र देऊन कारवाई करण्याचा दबाव ?
आपणास कळविण्यात येते की, आपल्या पथकाच्या माहे-जून-२०२५ च्या मासिक विवरणपत्राचा आढावा घेतला असता त्यामध्ये दर्जात्मक, किरकोळ प्रकरणासह इतर प्रकरणेही शुन्य असल्याचे आढळुन आलेले आहे. आपल्या पथकाची कामगिरी अंत्यत निराशाजनक व असमाधानकारक आहे. तसेच आपल्या पथकाच्या मार्गतपासणी कामगिरीमध्ये सुधारणा करणेबाबत आपणास वारंवार सुचना देवूनही आपणाकडुन आपल्या मार्गतपासणी पथकाच्या कामगिरीमध्ये कोणतीही सुधारणा केली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्याबाबतखा आपला सविस्तर खुलासा ४८ तासांचे आत लेखी स्वरुपात सादर करावा. त्याचबरोबर आपल्या पथकाचे माहे-जून-२०२५ चे टि-४ या कार्यालयास पुढील कार्यवाहीस्तव त्वरीत सादर करावेत. अन्यथा सदरबाबत आपणावर शिस्त व आवेदन कार्यपध्दतीनुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे धमकीचे पत्र विभागीय वाहतूक अधिकारी यांच्या सहीने काढण्यात आले आहे.
यातून, काहीही करा आणि वाहक आणि चालकांवर ठपका ठेवा. त्यांच्या कारवाई करा, टार्गेट पूर्ण करा आणि असे केलात तरच तुमचे कार्य चांगले! (त्याबद्दल आम्ही अभिनंदन करू आणि व्हॉटसॲप ग्रुपवर टाळ्या पिटू!) तेव्हा कारवाई कराच असा त्या पत्राचा मजकूर दिसतो! असे बिनडोकपणाचे (दुसऱ्याचे डोके वापरल्याचा परिणाम) पत्र विभागीय वाहतूक अधिकारी रत्नागिरी यांनी काढले आहे. हे पाहून विचारावेसे वाटते, ‘एसटी’च्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे काय?
एसटी प्रशासनामध्ये शिस्त आवेदन कार्यपद्धत अमलात आहे. पण त्या कार्यपद्धतीचा वापर कर्मचाऱ्यांना मुख्यत्वे चालक – वाहक यांना दाबण्यासाठी केला जातो. एस टी महामंडळात रोज अनेक प्रवाशांची ये – जा होते. वाहतुकीत काही गाड्यांना तर प्रवासी क्षमतेपेक्षा सुद्धा जास्त प्रवासी असतात. अशावेळी एखादा प्रवासी विनातिकिटाचा राहिल्यास व कंडक्टरने पैसे घेतले नसतील आणि तिकिटे दिलं नसेल तर मोटर वाहतूक अधिनियमांप्रमाणे चुकवलेल्या प्रवासाच्या तिकिटाच्या दुप्पट रक्कम किंवा 100 यापैकी अधिकची होणारी रक्कम दंड म्हणून भरावयाची असते. असा एसटी प्रशासनाच्या गाडीमध्ये लिखित नियम आहे. पण असा कोण प्रवासी मिळाला की त्याच्याकडून नियमाप्रमाणे दंडात्मक रक्कम वसूल केली जातेच पण शिस्त आवेदन कार्यपद्धतीखाली त्या वाहकावर कारवाई केली जाते. ती कारवाई म्हणजे त्याची इन्क्रिमेंट स्टॉप केली जाते. त्याचा दीर्घ परिणाम म्हणजे निवृत्तीच्या वेळी त्याचे तीन ते चार लाखाचे नुकसान केले जाते. आता कहर म्हणजे विना तिकीट मिळालेल्या प्रवाशाकडे दंड घेतला जातो आणि वाहकावरही कारवाई केली जाते. एकाच गुन्ह्यात दोन गुन्हेगार बनवले जातात. आता पुन्हा इथे आरामवीर सचिनचा रोल सुरू होतो. सचिन वाहतूक विभागात कार्यरत आहे पण तिथे तो असलेल्या अधिकाऱ्यांच्याही वरचा समजला जातो. हेच सचिन तपासणी अधिकाऱ्यांना जर वाहकावर केसेस टाकल्या गेल्या नाहीत तर त्या टाकाव्या म्हणून खुलासे मागणारी चार्जशीट तपासणी अधिकाऱ्यांना देतात. त्या भीतीपोटी पुन्हा तपासणी अधिकारी वाहकांवर काही वेळेस चुका नसताना सुद्धा केसेस टाकतात. हा असला प्रताप आरामवीर सचिनचा असल्याने त्याची विकेट बदली करून काढण्याची गरज होती. तशी बदलीही झाली होती. पण सायबाच्या जीवावर सचिन उदार या उक्तीमुळे ती थांबल्याची चर्चा आहे.




