देवरूख : प्रतिनिधी
देवरुख शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणा करतानाच, संगमेश्वर तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी सांगितलं.
देवरुख नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बाव नदीवर धरण बंधारा बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री सामंत यांच्या हस्ते काल झाले. पालकमंत्री डाॕ सामंत म्हणाले, देवरुख शहरातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळालं पाहिजे, असं नियोजन नगरपंचायत प्रशासनानं केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या ९ ते १४ वयोगटातील मुलींना कर्करोग होऊ नये म्हणून ५० हजार मुलींना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारा रत्नागिरी हा देशातील पहिला जिल्हा आहे.
यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता गणेश सलगर,तहसीलदार अमृता साबळे, मुख्याधिकारी श्री विसपुते, राहुल पंडित, जि.प. चे माजी अध्यक्ष रोहनजी बने, माजी सभापती बाबूजी म्हाप, देवरुख नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष मृणालताई शेट्ये, उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, दोन्ही गावचे सरपंच, सचिन मांगले, हनिफ हरचिरकर, नगरसेवक प्रफुल भुवड, वैभव पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.




