रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी येथे दिनांक १ सप्टेंबर रोजी जयेश मंगल पार्क, रत्नागिरी येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने युवतींसाठी विनामूल्य शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात हिंदू धर्मातील विविध चालिरीतींचे महत्व, भारताचा शौर्यशाली इतिहास,कराटे व दंडसाखळी प्रशिक्षण आणि स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धती तसेच मुलींनी स्वतःच्या रक्षणासाठी करायची पूर्वतयारी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे सुत्रसंचालन कु. मुक्ता भारद्वाज यांनी केले. कु.सुवर्णा सकपाळ व कु्.मृण्मयी कात्रे यांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले.
या शिबिराचा रत्नागिरी परिसरातील ७० युवतीने लाभ करून घेतला. कु.मृण्मयी कात्रे म्हणाल्या, ‘आज स्वातंत्र्याची ७७ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही युवती मात्र असुरक्षितच. आज समाजात अत्याचार, लैंगिक शोषण, बलात्कार तसेच लव्ह जिहादसारखी महाभयंकर संकटे स्त्रियांना असुरक्षित बनवत आहेत. महिलांवरील वाढते अत्याचार आणि अन्याय थांबवायचे असतील तर इतर कुणावरही अवलंबून न राहता आज स्वतःचे रक्षण स्वतः करायला सिध्द होऊया. आपल्याकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून न बघता आदराने बघणारा समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल, तर स्वतःच्या आचरणामध्ये पालट करायला हवे.झाशीच्या राणीचा आदर्श घेऊन हिंदू स्त्रीच्या या पवित्र देहा चे रक्षण होण्यासाठी धर्मशिक्षण घेऊन आत्मबळ वाढवूया.’
कु.सुवर्णा सकपाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण आपला शौर्यशाली इतिहास विसरता कामा नये. भगिनींनो,आता चंगळवादाची शिकवण देणाऱ्या अभिनेत्रींचा नव्हे,तर राष्ट्र आणि धर्मासाठी योगदान देणाऱ्या राजमाता जिजाऊ, राणी चन्नम्मा, राणी पद्मावती, प्रीतीलता वड्डेदार, झाशीची राणी लक्ष्मीबाई या वीरांगणांचा आदर्श समोर ठेवून आपण राष्ट्रवादी धर्म रक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे असे सांगितले. यावेळी सौ.स्वरा पांचाळ, कु.सिध्दि सुर्वे, सौ. स्वाती जोशी या शिबीरार्थींनी मनोगत व्यक्त केले.




