राजापूर : प्रतिनिधी
राजापूर- लांजा-साखरपा या विधानसभा मतदारसंघावर महायुतीमधून दावे प्रतिदावे होत असले तरी मागील काही वर्षात पक्षाची वाढलेली ताकद लक्षात घेता हा विधानसभा मतदारसंघ भाजपलाच मिळाला पाहिजे. शिवाय येथील उमेदवार हा स्थानिकच असला पाहिजे, ही मागणी भाजपच्या विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रप्रमुख उल्का विश्वासराव यांनी राजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. या विधानसभा मतदारसंघातील महिला मतदारांची असलेली ५७ टक्के संख्या लक्षात घेता या विधानसभा मतदारसंघातून महिलेला उमेदवारी मिळायला हवी, असे सांगत त्यांनी आपण देखील इच्छुक असल्याचे स्पष्ट केले.
सन २०१४ नंतर या विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघातून आमचे उमेदवार श्री. नारायणराव राणे यांना ५० हजाराहून अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी त्यांनी जोरदार मागणी केली.
मागील अनेक वर्षातील या मतदारसंघांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात विकास कामे झालेली नाहीत. तालुक्याचे प्रश्न तसेच राहिले. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या समस्या आजदेखील कायम राहिल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात विस्थापितांचे प्रमाण पहावयास मिळेल. सर्वत्र उदासीनता दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. मागील काही महिन्यात सत्तेच्या माध्यमातुन या विधानसभा मतदारसंघात आणलेल्या निधीची त्यांनी माहिती दिली. साखरी नाटे येथे मिळवून दिलेल्या कोट्यावधी निधीची त्यांनी माहिती दिली. राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या५७ टक्के असून येथून महिला उमेदवाराला संधी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत आपण इच्छुक असल्याचे सौ.विश्वासराव यांनी स्पष्ट केले.




