रत्नागिरी : प्रतिनिधी
श्रावण महिना सुरू झाला आणि हिंदू सणांची रेलचेल सुरू झाली. श्रावण महिन्यातील महत्वाचा सण म्हणून गोकुळ अष्टमी आणि गोपाळकाला यांच्याकडे पाहिले जाते. जिल्ह्यात ठिकाणी दहीहंडीचा माहोल सुरू होणार असून रत्नागिरी शहराच्या मुखाशी होणारी दहीहंडी म्हणजे महालक्ष्मी तरुण मंडळ, कुवारबावची मानाची दहीहंडी दिनांक २७ ऑगस्ट रोजी जल्लोषात साजरी होणार आहे. कुवारबाव बसस्टॉप येथे ही दहीहंडी उभारण्यात येणार आहे.
विसरून सारे मतभेद, लोभ अहंकार दूर सोडा, हिंदू धर्म मनात जागवून, आपुलकीची दहीहंडी फोडा हे ब्रीदवाक्य घेऊन महालक्ष्मी तरुण मंडळ दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत आहे. हा दहीहंडी उत्सव गेले बारा वर्ष अविरत चालू आहे. समाजासमाजातील भेदाभेद दूर सारून हिंदू एकतेची शिकवण देणारी ही दहीहंडी ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक देणारी आहे. या दहीहंडी उत्सवास विविध मंडळांनी सलामी द्यावी तसेच जनतेने उपस्थित राहून जल्लोष करावा, असे आवाहन महालक्ष्मी तरुण मंडळातर्फे करण्यात आले आहे.



