रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता तरी नराधम सापडलेला नव्हता. या घटनेनंतर नागरिकांना या प्रकरणी काय कारवाई केली? असा थेट जाबच पोलिसांना विचारला आहे. महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर बनला आहे. कारण मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरु आहेत. आरोपींना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
बदलापूरच्या घटनेमुळे राज्यातलं वातावरण तापलेलं असताना आता रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. त्यामुळे संतप्त नागरीक थेट रस्त्यावर उतरले. नागरिकांकडून पोलिसांना जाब विचारला गेला. तर पोलिसांकडून नागरिकांना शांतपणे कारवाई सुरु असल्याचं सांगितलं गेलं. संबंधित घटनेनंतर रत्नागिरीत नर्सेसने एकी दाखवत जिल्हा शासकीय रुग्णालयाचं कामकाज बंद पाडले होते.
रत्नागिरीच्या चंपक मैदानमधील ही घटना घडली आहे. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. पीडित मुलगी ही नर्सिक कॉलेजची विद्यार्थिनी आहे. ती घरी येत असताना तिला वाटेत अचानक चक्कर आली. त्यामुळे तिने रिक्षा थांबवली. रिक्षातून उतरल्यानंतर काय झालं हे तिला आठवत नाही. तिला जाग आली तेव्हा ती चंपक मैदान परिसरात होती. तिने आपल्या कुटुंबियांना फोन केला. आपल्यावर अत्याचार झाल्याचा संशय तिने व्यक्त केला. यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक नागरीक आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचा स्टाफ आक्रमक झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. सामान्य नागरिकदेखील पोलिसांना जाब विचारताना दिसत आहेत. सर्वपक्षीय पदाधिकारी शासकीय रुग्णालयाच्या बाहेर आले आहेत.
यावेळी पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “पोलीस तीन तासांपासून पाळत ठेवून आहेत. पीडितेचा वैद्यकीय अहवाल आलेला नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे”, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने नागरिकांना दिली. “सकाळी साडेआठच्या दरम्यानची घटना आहे. पोलिसांनी त्या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपी आहे. त्याला शोधण्यासाठी वेळ लागणार आहे. आम्ही चार पथकांना काम दिलेलं आहे”, अशीदेखील माहिती पोलीस अधिकाऱ्याने नागरिकांना दिली.