- भाजपचे निष्ठावंत नेते बाळासाहेब माने यांची अनुपस्थिती
- विधानसभा निवडणूकीत नव्या समीकरणाची नांदी
- भाजप कार्यकर्ते ‘अभी नहीं तो कभी नहीं’ मोडवर
- लोकसभा निवडणुकीतील बेबनावाचा वचपा काढण्याची तयारी
रत्नागिरी : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्ह्यातही पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्याच धर्तीवर महायुतीत ‘समन्वय’ साधण्यासाठी एक बैठक रत्नागिरीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाजपचे, शिंदे गट शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डझनभर नेते उपस्थित होते. मात्र भाजप, राष्ट्रवादीच्या महत्वाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. त्यामुळे केवळ डझनभर नेत्यांमध्ये समन्वय करण्यासाठी ही बैठक होती का? असा सवाल उपस्थित होत आहे. या बैठकीला भाजपचे निष्ठावान नेते बाळासाहेब माने यांची अनुपस्थिती सगळ्यांना जाणवली. त्यामुळे काही भाजपचे पदाधिकारी आले होते ते पण माघारी फिरले. त्यात काही भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते, ते नाईलाज म्हणून आले असल्याची चर्चा बैठकीच्या ठिकाणी होती.
भाजपकडून प्रसाद लाड यांनी शिवसेनेच्या उदय सामंत यांच्याशी ‘समन्वय’ साधला असल्याने हा समन्वय नेहमीप्रमाणेच होता. त्यात काही नवीन नाही. दोघेजण पूर्वी राष्ट्रवादीतून कारकीर्द सुरू करणारे मित्र असल्याने हा समन्वय घट्ट असल्याची चुणूक या बैठकीत दिसून आली. एकमेकांवर स्तुतीसुमने उधळण्याची स्पर्धा या मित्रांमध्ये लागली असल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून येत होते. साधारण भाजपची मतांची, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आज जी मोट बांधली गेली आहे. ती बाळासाहेब माने यांच्यासारख्या स्थानिक असंख्य निष्ठावंतांच्या जोरावर आहे. त्यात कधीही दलबदलूपणा नाही. जी काही आहे ती निष्ठाच! भाजपच्या पडत्या काळात भाजपला धरून ठेवून उत्कर्षाच्या काळात उतुमातू न जाणारी ही निष्ठावंताची फळी आहे. या फळीला निष्ठेचे डोस पाजायला निष्ठावंतच हवा! त्याला ईकडून तिकडून फिरून आलेला समन्वयक असू नये. पण लक्षात कोण घेतो? विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने, ज्येष्ठ नेते सतीश शेवडे, प्रा. नाना शिंदे, दत्ताजी देसाई, बडू पाटकर यासारख्या असंख्य भाजपेयी रक्ताच्या जीवावर आज पक्ष जिवंत आहे. आज महायुतीत असलेले उदय सामंत यांनी अनेकदा भाजप संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप आहे त्यापेक्षा वाढत गेला. काही आपमतलबी पक्ष सोडून गेले आणि अडगळीत पडले. मात्र भाजपला संपवीणारा जन्मला नाही. का? कारण भाजपच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची निष्ठा पक्की होती. त्यात मतदारांची निष्ठा पक्की होती. यामागे संघाची विचारधाराही महत्वाची आहे. संघाच्या तालमीत तयार झालेले नेते आणि कार्यकर्ते भाजपला लाभले. जीव गेला तरी पक्ष सोडणार नाही. कित्येकवेळा पडलो तरी निष्ठा विकणार नाही, असे म्हणणारे देवदुर्लभ कार्यकर्ते भाजपाला लाभले. ते समन्वय करून सामंत यांच्या दावणीला बांधणार आहात काय? हा सवाल कार्यकर्ते खासगीत विचारत आहेत. लाड आणि सामंत मित्र असतील, मात्र मैत्रीचा विचार करताना सामान्य मतदार आणि कार्यकर्ता यांच्या मनाचा ठाव घेण्याची गरज आहे.
भाजपचे निष्ठावान नेते बाळासाहेब माने समन्वय बैठकीला उपस्थित नाहीत. याचा अर्थ आगामी काळातील वादळाची ही शांतता आहे हाच आहे. कारण ज्याने भाजपच्या पडत्या काळात पक्षाला त्रास दिला. कार्यकर्ते गत विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून राबले असताना, सामंत यांच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला असताना, निवडून आल्यावर सामंत यांनी काय केले? भाजपची माणसे फोडली. जमेल तिथे भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कोंडी केली, ती कोणीही विसरलेले नाहीत. मग काय डोंबलाचा समन्वय करताय? समन्वय करायचा असेल तर तो पिळवणूक केलेल्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांच्या मनाशी प्रदेशावरील नेत्यांच्या मनाचा करा! समन्वय करायचा असेल तर तो विचार एक आहेत का ? हे बघून करा. हिंदुत्वाचा बुरखा घालून त्या बुरख्याखाली कोणता विचार आहे हे तपासून त्या विचारांचा आपल्या विचारांशी समन्वय होईल का? ते बघा. मुळात हिंदुत्व बेगडी असणारे भाजपने सोबत घेऊ नयेत. अन्यथा लोकसभा निवडणुकीत जो फटका बसला तसा विधानसभेत बसायला वेळ लागणार नाही. रत्नागिरीत कुणालाही विचारा, सामंत यांचे हिंदुत्व काय हो? उत्तर तपासून बघा. हिंदुत्व नुसते बोलून असू नये. तर त्यात हिंदूंच्या हिताचे पाऊल असावे. आज कोणत्याही हिंदुत्वनिष्ठ माणसाला याबद्दल विचारून पाहा. तुम्हाला समन्वय करू नये, हाच निष्कर्ष काढावा लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धर्मवीर स्व. आनंद दिघेसाहेब आणि हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले नेतृत्व आहे. त्यामुळे त्या दोघांनी शिंदे यांना पैलू पाडून त्यांचा हिरा बनवला आहे. हिंदुत्व त्यांच्या नसानसात भिनले आहे. मात्र त्यांच्यासोबत असणारे सगळेच हिरे, माणिक, मोती असतील असे नाही. त्यांच्या नसात हिंदुत्व असेलच असे नाही. नाहीतर उद्धवजी ठाकरे यांना अनधिकृत मशिदी अधिकृत करण्याचे पत्र सामंत यांनी दिलेच नसते.
आता लोकसभा निवडणूक आठवून पहा. रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत पालकमंत्री असताना खा. नारायण राणे साहेबाना ५० हजार पिछाडी मिळते. त्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात १० हजार पिछाडी. हे काय आहे? कुणी केला बेबनाव? याचा हिशेब होणार आहे की नाही? सिंधुदुर्ग एकहाती राणे यांच्या पाठीशी राहिले नसते तर? ४० वर्षांनी भाजपचा खासदार झाला. आता २० वर्षांनी पुन्हा भाजपचा आमदार होऊ शकतो. पण भाकरी परतायला लागेल. तीच भाकरी सारखी – सारखी भाजली तर करपून जाते. याचा विचार करून समन्वय करायला हवा, हे मात्र नक्की!




