देवरूख : प्रतिनिधी
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात एम. एससी. इन डेटा सायन्स हा अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या(Artificial Intelligence) माध्यमातून विद्यार्थ्यांना नव्याने निर्माण होऊ घातलेल्या संधींचा विचार करून महानगरांप्रमाणेच दर्जेदार शिक्षणाची संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्याच्या हेतूने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयात राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, नवी दिल्ली(National Skill Development Corporation- NSDC), मान्यताप्राप्त माहिती तंत्रज्ञानाशी निगडित कंपनी युनिकौशल (Unikaushal) आणि कोडींग प्रो यांचे समवेत महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे.
या करारवर महाविद्यालयाच्यावतीने संस्थाध्यक्ष सदानंद भागवत आणि प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या तर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून मा. वरुण बात्रा आणि युनिकौशल कंपनीच्यावतीने उपाध्यक्षा मृदुला त्रिपाठी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. एम. एससी. इन डेटा सायन्स या मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी दिली. तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया जाणून घेण्यासाठी कार्यालयीन लिपिक अमित कुलकर्णी यांच्याशी ९४०४४७००७० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. ख्यातनाम संस्थांमध्ये सामंजस्य करार होत असताना राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे अधिकारी मोहम्मद कलाम, संस्था सचिव शिरीष फाटक, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. पुनम जाधव, युनिकौशल संस्थेचे महावीर गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.