रत्नागिरी : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बुधवार दि. २६ रोजी होणार आहे. या निवडणूकीमध्ये कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी ( टिडीएफ ) ने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असल्याचे कोकण विभागीय टिडीएफचे अध्यक्ष नरसू पाटील व सचिव सागर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर केले आहे.
कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी व महायुतीमध्ये सरळ लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. या निवडणूकीमध्ये शिक्षक मतदारांचे प्रमाण निर्णायक असते. शिक्षण क्षेत्रासमोरील समस्या व भविष्यातील आव्हाने लक्षात घेवून समस्त शिक्षक मतदारांनी मतदान करावे असे आवाहन कोकण टिडीएफ चे सचिव तथा रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सागर पाटील यांनी केले आहे.सध्या शिक्षण क्षेत्रासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी सन 2005 सातत्याने केली जात आहे. पटसंख्येच्या जाचक निकषांमुळे मोठ्याप्रमाणात शिक्षक व कर्मचारी अतिरिक्त होत आहेत. अनुदानित शाळा पटसंख्ये अभावी बंद पडत आहेत. मुख्याध्यापक पदे मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अनेक पदे रिक्त आहेत. शिक्षण क्षेत्रासमोरील प्रश्न सोडविण्यासंदर्भात शासनाची उदासिनता पाहायला मिळत असल्याचे सागर पाटील यांनी स्पष्ट केले. शिक्षक व पदवीधर आमदारांनी शिक्षण क्षेत्रासमीरील समस्या सोडविण्यासाठी विधान परिषदेमध्ये प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रासमोरील या सर्व समस्या लक्षात घेवून सर्वच शिक्षक मतदारांनी मतदान करावे असे आवाहन कोकण टिडिएफचे सचिव सागर पाटील यांनी केले आहे.