रत्नागिरी : प्रतिनिधी
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय पिस्तुल शूटिंग स्पर्धेत रत्नागिरी शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेच्या प्रथमेश गद्रे याने रौप्य पदक पटकावून प्रशालेच्या शिरपेचात तुरा खोवला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय पिस्तुल शुटिंग क्रीडा स्पर्धा एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल,डेरवण, ता. चिपळूण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यामध्ये रा. भा. शिर्के प्रशालेच्या प्रथमेश रणजित गद्रे या इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने १७ वर्षाखालील ओपन साईट पिस्तूल शूटिंग स्पर्धेमध्ये उत्तम गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त करत रजत पदक पटकावले आहे. त्याची कोल्हापूर विभागीय पिस्तूल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी पुष्कराज शूटिंग अकॅडमी रत्नागिरी तर्फे श्री व श्रीमती पुष्कराज इंगोले ह्यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथमेश यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.