रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील सर्वच पक्ष सुस्तावलेल्या अवस्थेत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्रिय राहून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहे. शहरातील नाचणे रोड येथे दर मंगळवारी आठवडा बाजार ज्या जागेत भरतो, तेथे आता नागरिकांच्या सोयीसाठी व नगरपरिषदेला उत्पन्न प्राप्त होण्याच्या दृष्टीने व्यापारी संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. मनसेतर्फे नगर परिषदेला निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली.

उपमुख्याधिकारी माने यांना दिलेल्या निवेदनात मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजारच्या या जागेत दोन मजली इमारत उभारण्यात यावी. यामध्ये तळमजल्यावर आतील बाजूस भाजीपाला व फळविक्रीसाठी स्वतंत्र विभाग आणि मांस व मत्स्यविक्रीसाठी स्वतंत्र विभाग तर बाहेरील बाजूस दुकान गाळे असावे व दुसऱ्या मजल्यावर बहुपयोगी सभागृह बांधण्यात यावे, अशी मागणीवजा सूचना मनसेतर्फे करण्यात आली आहे. रत्नागिरी शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून यावर नगरपरिषद प्रशासनाने विचार करावा असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहर संघटक अमोल श्रीनाथ, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, विभाग अध्यक्ष दिलीप नागवेकर, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव,शाखाध्यक्ष साहिल वीर, मनसे रस्ते आस्थापना तालुका संघटक सतीश खामकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.



