दरवाजाची, खिडकीची, तसवीरीची, रुढींची, परंपरांची, कायद्याची, संस्कारांची, तुझी, माझी, आपल्या साऱ्यांची….
चार बाजू आणि चार शिरोबिंदू यांनी बंदिस्त असलेली बहुभुजकृती, चौकोन-चौकट. मग कधी तिच्या चारही बाजू सारख्या लांबीच्या असतात तर कधी समोरासमोरील सारख्या असतात तर कधी चारही बाजू असमान असतात. पण आकार चौकोनीच.
चौकटीत असणं काहींना रुचतं; सुरक्षित वाटतं तर काहीजण चौकट मोडून उधळून चौखूर (इथेही ४) धावत सुटतात. आता चौकट मोडावी का विस्तारावी हा कळीचा प्रश्न आहे. पण विस्तार हा नेहमी जीवनदायीच असतो नं! मग मोडण्यापेक्षा चौकट विस्तारणं नेहमीच स्वागतार्हच नाही का?
सनातन वैदिक संस्कृती लाभलेल्या आपल्या हिंदुस्थानात आपल्या या अभ्यासू पूर्वजांनीदेखील काही चौकटी सांगितल्या आहेत. चार पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम व मोक्ष, चार आश्रम: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, चार वर्ण: ब्राह्मण, क्षत्रिय,वैश्य आणि शूद्र.
यांत ‘धर्माला’ मान्य असलेला ‘काम’ पूर्ण करण्यासाठी ‘अर्थ’ कमवून ‘मोक्षाची’ कास धरायची आहे. हे साधणं तसं अवघडच कारण काम आणि अर्थ हे सद्सद्विवेकावर भारी पडू शकतात. सद्सद्विवेकाला ग्रासणारे राहुकेतूच जणू ते.
असं असलं तरीही ही चौकट अखंड अबाधित ठेवायची आहे ती चार आश्रमांच्या माध्यमातून आणि चारही वर्णातील मंडळींनी! वैदिक काळात चातुर्वर्ण्यव्यवस्था ही जन्मावर नव्हे तर कर्मावर आधारित होती आणि तीच योग्य! नाही का?
आपण आहोत ती सृष्टी सुद्धा एक चौकटच आहे. लांबी, रुंदी, उंची (किंवा खोली) आणि चौथी मिती म्हणजे काळ (वेळ). या चौथ्या मितीला भेदणं, पार करणं किंवा गरजेनुसार जोड-मोड करणं अजून तरी मानवाला जमलेलं नाही. काळाच्या पार मागे किंवा पुढे अजून तरी आपल्याला जाता आलेलं नाहीये त्यामुळे ही चौथी मिती अजून तरी अभेद्यच राहिली आहे.आपण दिवसभर खूप वणवण करतो पण घरी आल्यावर कसं बरं वाटतं! दरवाज्याची चौकट ओलांडून आत आलो की कसं आश्वस्त वाटतं. चार भिंतींची ऊब आपल्याला सुखावते. कितीही काहीही म्हटलं तरी ही चार भिंतींची चौकट आपल्याला सुरक्षिततेची भावना देते, आश्वस्त करते.
पारा जमिनीवर पडला सगळीकडे विखुरतो किंवा पाणी जमिनीवर सांडलं तर सगळीकडे पसरतं म्हणून त्यांना अडवायला किंवा सांभाळायला चौकटरुपी भांडं गरजेचं असतं. अगदी तसंच आहे मानवी मनाचं. सोडून दिलं तर ते चौखूर उधळले, सगळी व्यवस्थाच बिघडेल त्यामुळे. तर तसं होऊ नये म्हणूनच हवी ती संस्कारांची, नियमांची, कायद्याची चौकट!
ही चौकट मोडणारे इतिहास घडवतात असं म्हणतात. कदाचित तो इतिहास गौरवशाली असेल किंवा लज्जास्पद असेल. गौरवशाली इतिहास घडवणारे चौकट मोडत नाहीत तर ती विस्तारतात आणि दुसऱ्या विषयी न बोललेलंच बरं. शहण्यास शब्दांचा मार!
आपणही आपली चौकट विस्तारूय. सर्वसमावेशक अशी एकच मोठी चौकट बनवूया. ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या प्रमाणे ‘हे विश्वची माझे घर’ बनवूया. सगळे मिळून एकत्र पुढे जाऊ.
ना तुम; तुम रहो
ना हम; हम रहे
सब साथ मिलके
चलो हम बनें।।
– उमा जोशी