रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीकरांना करोडोंचा चुना लावणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीविरोधात शुक्रवार , ७ जूनपर्यंत ३३६ जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून फसवणुकीची रक्कम ४ कोटी १८ लाखांवर गेली आहे.कंपनीची फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी दिल्लीसह पुण्यात गेलेली पथके अजून परतलेली नसून , अन्य संशयितांचा कसून शोध घेतला जात आहे. यापूर्वी तपासाची चक्रे वेगाने फिरवून कंपनीच्या चार संचालकांपैकी संजय केळकर आणि प्रसाद फडके या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर अन्य दोन संचालक अद्याप फरार आहेत.
या कंपनीच्या वेगवेगळ्या योजनेमध्ये रत्नागिरी बरोबरच सिंधुदुर्गातील कुडाळ तसेच सांगली, मिरज, पूणे येथील नागरिकांनीही मोठी गुंतवणूक केली आहे . पोलिसांनी आवाहन केल्यानंतर आता दिवसेंदिवस तक्रारदारांची संख्या वाढत असून आतापर्यंत ३३६ जणांचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे . या प्रकरणी दोन संचालकांच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी आता अन्य दोन संचालकांना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी आपली पथके रवाना केली आहेत . परंतू त्यांचे मोबाईल लोकेशन सापडत नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहचण्यात अडथळे निर्माण होत आहेत.