रत्नागिरी : प्रतिनिधी
कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. २६ जूनला सकाळी ७ ते ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. गुजरात राज्याची सीमा ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत हा मतदारसंघ असून त्यात ४८ तालुक्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत दोन लाख पदवीधर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
यामध्ये सर्वाधिक मतदान ठाणे जिल्ह्यात ७३ हजार ३०५, रायगड ४५ हजार ३३८, रत्नागिरी २१ हजार ४२४, पालघर- ९ हजार ४८१, सिंधुदुर्गमध्ये १७ हजार ८४८ मतदारांची नोंदणी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणीकडे पदवीधर मतदारानी उदासीन धोरण पत्करल्याचे दिसत आहे .
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १७ मतदान केंद्रे आहेत. कोकण पदवीधर मतदार संघात विधान परिषदेमध्ये आतापर्यंत भाजपचा वरचष्मा राहिला आहे. निरंजन डावखरे एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले आहेत. भाजपने त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. काँग्रेसमधून रत्नागिरीचे उद्योजक रमेश कीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर मनसेने आपला उमेदवार देणे रद्द केले आहे.