रत्नागिरी : प्रतिनिधी
भाजपचे फायरब्रँड नेते माजी खासदार निलेश राणे यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार असल्याचे समजते. आज वर्षा बंगल्यावर निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी कोकणातील शिवसेना नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह भरत गोगावले उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून निलेश राणे यांचे नाव निश्चित आहे. माजी खासदार निलेश राणे हे भाजपाकडून नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ही उमेदवारी लढवणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २३ ऑक्टोबर रोजी कुडाळ दौऱ्यावर येण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे निलेश राणे यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीकडून जागावाटप आणि उमेदवारांची निश्चिती यासाठी धावपळ सुरू आहे. काही वेळापूर्वी निलेश राणे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २३ ऑक्टोबर रोजी कुडाळ दौऱ्यावर येण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे निलेश राणे यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.
निलेश राणे हे यापूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी गेले दोन वर्षांपासून अधिक काळ जोरदार तयारी सुरू केली आहे. याचा उपयोग त्यांना लोकसभा निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळाले. निलेश राणे त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या जवळ बोलून या सगळ्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
आमदार वैभव नाईक हे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या समोर निलेश राणे यांचं आव्हान असणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून सुमारे २६ हजार ५०० लीड मिळालं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांच्यासाठी यावेळी विधानसभा निवडणूक ही सोपी नाही. २०१४ मध्ये झालेल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता, तर २०१९ भाजपाचे अपक्ष उमेदवार रणजीत देसाई यांचा १४ हजार मतांनी आमदार वैभव नाईक यांनी पराभव केला होता. त्यामुळे या वेळच्या विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या कोकणाचं लक्ष लागून राहिलं आहे.