रत्नागिरी : प्रतिनिधी
मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सव कालावधीत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वजन क्षमता असणाऱ्या वाहनांना वाहतूक करण्यास मनाई केली आहे. गणेश भक्तांचा प्रवास सुरक्षित व्हावा या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्ग विविध दिवशी तब्बल २१६ तास बंद असणार आहे.
या कालाधीत फक्त अवजड वाहनांना या मार्गावरुन वाहतूक करता येण्यास मज्जाव केला आहे. अवजड वाहनांना बंदी घातली असताना दुसरीकडे मात्र रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने गणेशभक्तांचा प्रवास खडतर असणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सरकारने सूट दिली आहे.गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या कालावधीत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वजन क्षमता असणाऱ्या वाहनांना वाहतूक करण्यास मनाई केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मुंबई ते सावंतवाडीदरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास म्हणून ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे. तर ५ व ७ दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासासाठी ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी ११ दिवसांचे गणेशमूर्तीचे विसर्जन, परतीच्या प्रवासाकरिता १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते १८ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत बंदी राहील.
या महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना ८ सप्टेंबर रात्री ११ वाजेपासून ते ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता आणि १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहनांना १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहील.