सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवछत्रपतींचा भव्य पुतळा सोमवारी कोसळल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या हा भव्य पुतळा कोसळून पडल्याने प्रशासन व सरकारच्या विरोधात सिंधुदुर्ग तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दिनांक ४ डिसेंबर रोजी नौदल दिन मोठ्या उत्साहात मालवणात साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नौदल दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर भव्य शिवछत्रपतींचा पुतळा महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागातर्फे उभारण्यात आला होता.
पुतळा कोसळल्याचे प्रशासनाला कळताच जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी तहसीलदार व बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ राजकोट येथे भेट देऊन या जागेची पाहणी केली व येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजले आहेत.
मालवण शहरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक असा हा पुतळा होता. आठच महिन्यापूर्वी हा पुतळा उभारण्यात आला होता. इतक्या कमी वेळेत हा पुतळा कोसळल्याने या पुतळ्याचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी, अशी तीव्र स्वरूपाची भावना सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. खरंतर सिंधुदुर्ग हा शिवछत्रपतींचा अभेद्य किल्ला आजही अस्तित्वात आहे आणि तो अतिशय डौलाने उभा आहे. भर समुद्रात असलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीला किरकोळ तडा गेल्या तरी या किल्ल्याचे अस्तित्व अद्यापि शाबूत आहे. महाराजांनी बनवलेला किल्ला व त्याच्या तटबंद्या इतक्या अभेद्य आहेत की गेले अनेक वर्षे समुद्राच्या लाटाने सुद्धा किती वेळा आक्रमण करूनही तो डौलाने उभा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला मालवण शहरातील राजकोट येथील शिवछत्रपतींचा पुतळा आठच महिन्यात कोसळतो ही अतिशय चिंताजनक बाब आहे.
राज्य सरकारने करोडो रुपये खर्च करून मालवणात नौदल दिन साजरा करण्यात पुढाकार घेतला आणि अशावेळी मालवण समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट भागात उभारण्यात आलेला पुतळा कोसळतो ही प्रशासनाची खरीच नामुष्की आहे, अशी आता टीका होऊ लागली आहे.



