व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे आपल्या मराठीत. प्रसंग एकच पण त्याविषयी मनात उमटणाऱ्या भावना या माणसागणिक बदलतात….
अनेक घटना आपण आठवून पहा. एका अंगाने तिच्याकडे पाहता ती आनंददायी, यशस्वी अशी वाटते तर तिच घटना दुसऱ्या अंगाने अगदी विरुद्ध भावना उत्पन्न करते. म्हणूनच म्हणतात की संकटकाळीच खऱ्या मित्राची परीक्षा होते. ” सुख के सब साथी, दुःखमे न कोई ” असं उगाच का गायलंय!
सुखाच्या, आनंदाच्या, यशाच्या, मिळकतीच्या क्षणी अनेक जण जवळ येतात. वाहवा करतात, अगदी गुळाला मुंगळे चिकटावेत तसे. तसंच या यशात वाटेकरी होणारेही असतात. हे यश आमच्यामुळेच कसे मिळाले हे वाढवून फुगवून सांगणारेही असतात.
आणि अगदी त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला जो अयशस्वी किंवा पराजित झालेला आहे त्याच्या भोवती सुद्धा मुंगळे असतातच पण ते डंख मारतात. द्वेषाचे विष कालवतात मनात.
अनेक वेळा आपले कौतुक करणारी व्यक्ती ही आपली आप्त, मैत्र आहे की केवळ जिभेवर साखर आणि मनात हलाहल असलेली आहे हे ओळखणे अतिशय कठीण असते. अशी मायावी मने आपल्या आजूबाजूस खूप असतात. ती पारखता येणं हे एक कसब आहे. मात्र हे कसब अंगी बाणवायाला बराच काळ जावा लागतो. अनेक टक्के टोणपे, अनेक घाव, अनेक जखमा, अनेक व्रण सोसावे लागतात.
एवढे करूनही अनेकदा अशी व्यक्ती आपण ओळखली तरी आपण काहीही करू शकत नाही.एक तर आपला स्वभाव भिडस्त असतो किंवा ती व्यक्ती प्रभावशाली असते किंवा दगडावर डोकं आपटून घेऊन काही उपयोग नाही हे आपल्याला माहीत असतं.
पण ही वृत्ती काही एका दिवसात निर्माण होत नाही. ती हळूहळू वाढते. अनेकदा अभिनंदन करतानासुद्धा शालजोडीतले मारणारे असतात. पण हा विचार करत नाहीत की कोणी असंच आपल्याशी वागलं तर?
अनेकदा काय होतं की समोरच्याचं यश मान्य करण्यासाठी आवश्यक असलेला मनमोकळेपणा आपल्याकडे नसतो. म्हणावं ना की बाबा आहेस तू श्रेष्ठ, वरचढ, कार्यकुशल वगैरे वगैरे. काय बिघडलं? पण नाही माझ्यातला अहंकार मला तसं करण्यापासून रोखतो आणि आपल्या अपयशाला परिस्थिती कशी जबाबदार आहे आणि तो कसा शिरजोर आहे हेच बऱ्याचदा घोकल जातं.
पण अनेकदा एक व्यक्ती म्हणून विशेषतः एक आई म्हणून मला नेहमी वाटतं की आपण आपल्या बाळाला वाढवतानाच असं वाढवलं तर? की जेणेकरून दुसऱ्याचा आनंद त्याला आपला वाटला पाहिजे किमानपक्षी तो नावडता किंवा क्लेशदायक तरी वाटू नये. गुणग्राहकता, श्रमसंस्कार या गुणांची जोपासना बालपणापासूनच जर केली (म्हणजे जर करू शकलो ) तर वाह काय सुरेख असेल तो समाज! जणू काही
” अवघा रंग एक झाला,
आप पर भेद नाही उरला,
सकळ मेळोनिया केला परमानंद …”
-उमा जोशी





